सुनीत पोतनीस

घाना.. पश्चिम आफ्रिकेतला, बहुतेकांना नावाने परिचित असलेला, अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरचा देश! गतशतकात, १९५७ साली घाना या देशाची निर्मिती झाली. ‘घाना’ म्हणजे स्थानिक भाषेत लढवय्या राजा. प्राचीन काळात पूर्ण पश्चिम आफ्रिकेत पसरलेले घाना हे साम्राज्य होते. या प्रदेशात सोन्याचा मुबलक साठा असल्यामुळे युरोपीयांनी तिथे वसाहती केल्यावर त्याचे नामकरण ‘गोल्ड कोस्ट’ असे केले होते. १९५७ साली या नवदेशाचा उदय होण्यापूर्वी गोल्ड कोस्टवर ब्रिटिशांचा अंमल होता. या नवीन देशाची निर्मिती होताना ब्रिटिशांनी त्याचे नाव ठेवले- ‘घाना’!

पूर्वेला टोगो, उत्तरेला बुरकिना फासो, पश्चिमेस कोट दी’आयव्होर (किंवा : कोट दी’वॉ) आणि दक्षिणेला गिनीचे आखात अशा सीमा असलेल्या घानाचे अक्रा हे राजधानीचे शहर आहे. १५ व्या शतकात युरोपीय लोक इथे दाखल होण्यापूर्वी येथे स्थानिक जमातींची राज्ये होती. घाना या साम्राज्याचे संपूर्ण पश्चिम आफ्रिकेत वर्चस्व होते. पोर्तुगीज व्यापारी हे या प्रदेशात पोहोचलेले पहिले युरोपीय. १४७० साली पोर्तुगीज इथे आले. सोने, हस्तिदंत व लाकूड यांच्या व्यापारात आपले बस्तान बसवून त्यांनी किनारपट्टीवर वसाहत स्थापली. पुढे या प्रदेशातून तरुणांना गुलाम बनवून बाहेर विकण्याचा व्यवसाय तेजीत आला. सोन्याच्या व्यापारापेक्षा गुलामांच्या व्यापारात अधिक कमाई होती.

पोर्तुगीजांची गोल्ड कोस्टमधील व्यवसायाची माहिती कळल्यावर गुलामांच्या व्यापाराचे आकर्षण वाटून १६ व्या शतकात डच, ब्रिटिश, डॅनिश आणि स्वीडिश ही अन्य युरोपीय व्यापारी मंडळी इथे दाखल झाली. या युरोपीय व्यापाऱ्यांमुळे गोल्ड कोस्टमधील गुलामांच्या व्यापारात सुसूत्रता आली. पोर्तुगीजांनी या प्रदेशात ‘साओ दा मिना’ हे व्यापारी ठाणे प्रस्थापित करून ‘एलमिना कॅसल’ हा किल्ला बांधला. पुढे १७ व्या शतकाच्या मध्यावर पोर्तुगीजांनी त्यांच्या अमलाखालचा प्रदेश व व्यापार डच लोकांना देऊन गोल्ड कोस्ट कायमचे सोडले. डचांचा प्रदेश आता ‘डच गोल्ड कोस्ट’ झाला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या प्रदेशात ‘स्वीडिश गोल्ड कोस्ट’, ‘डॅनिश गोल्ड कोस्ट’, ‘जर्मन गोल्ड कोस्ट’ आणि ‘ब्रिटिश गोल्ड कोस्ट’ उभारले गेले. या सर्व युरोपीय व्यापाऱ्यांनी या प्रदेशात ३० हून अधिक किल्ले आणि गढय़ा बांधल्या.

sunitpotnis94@gmail.com