सिंह.. ‘पँथेरा लिओ’ हे शास्त्रीय नाव धारण करणारा जंगलाचा राजा! सुमारे तीन लाख वर्षांपासून त्याचे अस्तित्व आशिया आणि आफ्रिकेमध्ये आढळून येते. आशियाई सिंह एके काळी मोठय़ा संख्येने ग्रीसपासून मध्य भारतात बिहापर्यंत आढळत होते. पण आता भारतात ते केवळ गीरच्या जंगलातच दिसतात. किंबहुना जगभरच सिंहांची संख्या हळूहळू घटू लागली आहे. त्यामुळे सिंहांचे संवर्धन व्हावे, त्यांची तस्करी थांबावी या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी ‘बिग कॅट इनिशिएटिव्ह- नॅशनल जिओग्राफिक’चे सहसंस्थापक डेरेक आणि बेव्हर्ली ज्योबेर यांनी २०१३ पासून ‘जागतिक सिंह दिन’ साजरा करण्याचे ठरवले.

भारतात केवळ गुजरातमधील गीरच्या जंगलात आढळणारी ‘एशियाटिक लायन’ची एकमेव प्रजाती आहे. त्यामुळे अर्थातच येथील सिंहांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही जोखमीची कामगिरी. जंगलांना लागणाऱ्या वणव्यांपासून या सिंहांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक आदिवासी चोखपणे आणि कर्तव्यदक्षतेने पार पाडत आहेत. त्यांना रसिला वधेर, मनीषा वाघेला, केयुरी खामला आणि त्यांचा ४० जणींचा वनरक्षक चमू सक्रिय साहाय्य करत आहे.

२००७ साली गीरच्या जंगलात या महिला वनरक्षकांची नेमणूक करण्यात आली. दररोज सरासरी २५ किलोमीटर भागात दिवस-रात्र पहारा देण्याचे काम या महिला वनरक्षक करीत आहेत. जंगलाच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांकडून होणारी वृक्षतोड थांबविण्याची तसेच सिंहांची होणारी शिकार रोखण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. पहारा देत असताना अनेकदा या महिला वनरक्षकांवर सिंहांनी हल्ला केला. परंतु तरीही सिंहांना जिवापाड जपण्याच्या या कार्यापासून त्या ढळल्या नाहीत. त्यामुळेच २०१० साली गीरमध्ये केलेल्या गणनेत ४११ असलेली सिंहाची संख्या २०१५ च्या गणनेत ५२३ झाली. सिंहांच्या वाढत्या संख्येवरून या महिला चमूची कामगिरी लक्षात येते.

सिंहांबरोबरच अन्य वन्यजीवांच्या गरोदर मादीची काळजी, पिलांचा जन्म, वाढत्या पिलांवर देखरेख अशी विविध कामे हा महिला चमू पार पाडत आहे. सिंहांच्या सुरक्षित अधिवासासाठी या वनरक्षक महिला झटताना दिसतात. देशभरात अभयारण्यात वनरक्षक म्हणून काम करणारा हा पहिला आणि एकमेव महिला अधिकाऱ्यांचा चमू आहे. ‘द लायन क्वीन्स ऑफ इंडिया’ म्हणून गौरवल्या गेलेल्या या गीरच्या जंगलातील महिला वनरक्षकांच्या संवर्धनकार्याची आणि साहसाची दखल जगभर घेतली जातेय, हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org