28 October 2020

News Flash

कुतूहल : जिराफांचे संवर्धन

‘जीसीएफ’ ही अशी एकमेव संस्था आहे, जी केवळ आफ्रिकेतील जिराफांचे संवर्धन व व्यवस्थापन यासाठी काम करते

(संग्रहित छायाचित्र)

 

आफ्रिकेतील गवताळ प्रदेश परिसंस्थेमध्ये जिराफाचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. परंतु मानवी लोकसंख्येची वाढ आणि अतिक्रमण, अधिवासांचा नाश आणि तुकडय़ांत विभाजन, शेतजमिनीचा विस्तार व वाढत्या खाणी, मांस- कातडी- शेपटीचे केस यांसाठी केली जाणारी अवैध शिकार, इतर प्राण्यांपासून संक्रमित होणारे आजार, मानवी व शहरी हस्तक्षेप.. या सर्व कारणांमुळे जिराफाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी त्यांची संख्या कमी होते आहे.

१९८५ मध्ये झालेल्या गणतीनुसार, उपलब्ध माहिती पाहता आफ्रिकेत सुमारे १,५५,००० जिराफ असतील असा अंदाज बांधण्यात आला. त्यामुळे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर’ अर्थात ‘आययूसीएन’च्या ‘रेड डेटा’ यादीमध्ये जिराफांबाबत ‘विशेष काळजी करण्यासारखी स्थिती नाही’ अशी नोंद करण्यात आली होती. परंतु २०१६ साली केलेल्या पाहणीत फक्त ९७,५१३ जिराफ शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच गेल्या तीन दशकांत जिराफांच्या संख्येत जवळपास ४० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे त्या वर्षी ‘आययूसीएन’च्या ‘रेड डेटा’ यादीत जिराफांची नोंद ‘असुरक्षित’ अशी केली गेली. २०१८ मध्ये बहुसंख्य जिराफांच्या उपप्रजाती अभ्यासल्या गेल्या, त्यापैकी काही ‘गंभीर धोकादायक’ म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत. ‘जिराफ कॉन्झव्‍‌र्हेशन फाऊंडेशन (जीसीएफ)’ या संस्थेने २०१९ साली केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आले की, जिराफांची संख्या घटण्याचे प्रमाण कमी झाले असून आता त्यांच्या नैसर्गिक अधिवासांत जिराफांची संख्या साधारण १,११,००० इतकी झाली आहे. मात्र दुसरीकडे, आफ्रिका खंडातील सात देशांतून जिराफ पूर्णपणे लुप्त झाला आहे.

‘जीसीएफ’ ही अशी एकमेव संस्था आहे, जी केवळ आफ्रिकेतील जिराफांचे संवर्धन व व्यवस्थापन यासाठी काम करते. त्यासाठी ही संस्था सरकार, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, संशोधक, स्थानिक गट आणि ‘आययूसीएन’ यांचे सहकार्य घेते. सध्या ‘जीसीएफ’चे कार्य आफ्रिकेतील १५ देशांत सुरू आहे. जिराफांच्या मोक्याच्या ठिकाणांचे वर्गीकरण, गुणसूत्रीय संशोधन, त्यांच्या गणनेचे व मूल्यांकनाचे सर्वेक्षण, उपग्रहाद्वारे नोंदींसाठी जिराफांच्या मानेवर जीपीएस पट्टय़ा बसवणे, त्यांच्या स्थलांतरविषयक प्रक्रिया आदी कामांबरोबरच ‘आययूसीएन’च्या सहकार्याने ‘जीसीएफ’ ही संस्था पर्यावरणीय शिक्षणासाठीही कार्यरत आहे. ‘जीसीएफ’प्रमाणेच ‘जिराफ अ‍ॅण्ड ओकापी स्पेशालिस्ट ग्रुप (जीओएसजी)’ या संवर्धन गटानेही आफ्रिकेतील जिराफांच्या संवर्धन व व्यवस्थापनात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. गेल्या काही दशकांत जिराफ दुर्लक्षित राहिले असले, तरी आता अशा संवर्धन गटांच्या प्रयत्नांना चांगले यश येत आहे आणि त्यामुळे नजीकच्या भविष्यात जिराफांची संख्या वाढेल अशी आशा करायला हरकत नसावी.

– तुषार कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2020 12:07 am

Web Title: article on giraffe conservation abn 97
Next Stories
1 कुतूहल :  जिराफांशी ओळख
2 मनोवेध : माणूस प्राणी
3 मनोवेध : मुलांतील समानुभूती
Just Now!
X