20 February 2019

News Flash

कुतूहल : हम काले है तो क्या हुआ..

१५६५ मध्ये गेस्नर यांनी ग्रॅफाइटची खनिज म्हणून नोंद केली.

चमकधमक आणि गोऱ्या रंगाचे आकर्षण सगळ्यांनाच असते, तरी काही जण आपल्या कर्तृत्वाने स्वत:च महत्त्व सिद्ध करतातच! काळे, चमकदार ग्रॅफाइट त्यांपैकीच एक. ग्रॅफाइट शिशासारखे दिसते म्हणून त्याला लॅटिनमध्ये ‘प्लंबॅगो’ म्हणजे शिसे असे म्हटले गेले. आपल्या पेन्सिलीतले शिसे हे शिसे नसून ग्रॅफाइट आहे.

१५६५ मध्ये गेस्नर यांनी ग्रॅफाइटची खनिज म्हणून नोंद केली. १७७९ मध्ये शेले यांनी ग्रॅफाइटचे ऑक्सिडीकरण झाले की कार्बन डाय-ऑक्साइड वायू मिळतो, यावरून ते कार्बनचे बनलेले आहे, हे दाखवून दिले. १७८९ मध्ये व्हेर्नर यांनी लिहिणे या अर्थाच्या ‘ग्राफेइन’ या ग्रीक शब्दावरून ग्रॅफाइट हे नाव या खनिजास दिले.

सहा कार्बनचे अणू एकत्र येऊन एक षट्कोन होतो आणि असे असंख्य षट्कोन एकमेकांना जुळून लांबी, रुंदी लाभलेली एका पातळीतली परत तयार होते. या एका प्रतलाला ग्राफीन असे म्हणतात. अशा ग्राफीनची अनेक प्रतले एकावर एक रचली गेली की त्याचे बनते ग्रॅफाइट. कागदावर पेन्सिलीने लिहिताना ग्रॅफाइटचे थर घसरल्याने लिहिणे सोपे होते.

ग्रॅफाइटच्या आतल्या स्तरांत मुक्त इलेक्ट्रॉन असल्याने ते विद्युतवाहक आहे. शिवाय त्याच्यात उच्च तापमान सहन करण्याचीही क्षमता आहे. त्याच्या प्रतलांमधील कमकुवत बंधांमुळेच त्याला मऊपणा येतो. त्यामुळे शुष्क वंगण म्हणून त्याचा उपयोग होतो. ग्रॅफाइटवर प्रखर उष्णतेचा किंवा विरल आम्ल, क्षार यांचा परिणाम होत नाही. म्हणून कारखान्यातील धातूंच्या वस्तूंचे आम्लांपासून व अपायकारक धुरांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्यावर ग्रॅफाइटच्या रंगाचे लेपन केले जाते. विद्युतवाहक आणि शिवाय वंगणासारखे असल्याने विद्युतजनित्रात त्याच्या स्पर्शकपट्टय़ा वापरतात. युरेनियमपासून निघणाऱ्या न्यूट्रॉन्सचा वेग नियंत्रित करण्यासाठी अणुभट्टय़ांमध्ये ग्रॅफाइटच्या विटा वापरतात. शुष्क विद्युतघट, विद्युत अग्रे, विजेची उपकरणे आणि त्यांचे भाग लोहात ग्रॅफाइट विरघळून एकरूप होते म्हणून पोलादातील कार्बनचे प्रमाण वाढविण्यासाठीही ते वापरतात.

पृथ्वीवर ग्रॅफाइटचे खनिजसाठे विपुल असले तरी त्याच्या गुणधर्मामुळे शुद्ध ग्रॅफाइटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कृत्रिम ग्रॅफाइट तयार करण्यासाठी कार्बनयुक्त पदार्थ डांबराबरोबर ९०० अंश ते १८०० अंश से. तापमानापर्यंत तापवून प्रथम ‘भाजलेला कार्बन’ तयार करतात. हा कार्बन पुढे विशिष्ट विद्युतभट्टय़ांत २२०० अंश से. किंवा अधिक तापमानास तापविला असता त्याचे ग्रॅफाइटमध्ये रूपांतर होते.

चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on February 13, 2018 2:07 am

Web Title: article on graphite