प्राचीन काळापासूनच नदीकडे स्त्री-रूप म्हणूनच पाहिले जाते. कदाचित म्हणूनच नदीचे शोषण मानव करत आलाय की काय, अशी शंका यावी इतपत आज नद्यांची भीषण परिस्थिती आहे. अशा अत्यावस्थ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य ‘सेरी’ म्हणजेच ‘सृष्टी इको-रीसर्च इन्स्टिटय़ूट’च्या माध्यमातून सुरू आहे. या संस्थेने राजस्थानातील उदयपूरच्या ‘अहार’ या मृतावस्थेत गेलेल्या नदीबाबत राबवलेला प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. यात या संस्थेने संपूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आणि त्याला नाव दिले- ‘ग्रीन ब्रिजेस’!

‘ग्रीन ब्रिजेस’ म्हणजे स्थानिक दगड, गोटे आणि वाळू यांच्याबरोबर विशिष्ट जिवाणूंचे विरजण वापरून तयार केलेला गाळणी-बंधारा. यातून नाल्याचे पाणी वाहताना प्रदूषणकारी पदार्थ त्यात शोषले जातात. त्यांचे विघटन कार्यक्षम जिवाणू घडवून आणतात आणि पाण्याचे शुद्धीकरण केले जाते.

साठच्या दशकानंतर अहार नदीमध्ये शहरातील मैलापाणी, सांडपाणी सोडले जाऊ लागले. हळूहळू ती ‘मैलावाहिनी’ झाली. त्यात जलपर्णी इतक्या वाढू लागल्या की, पाण्यावर सूर्यकिरणे पोहोचणेही अवघड बनले. नदीवर मोठय़ा प्रमाणावर पांढरा फेस दिसू लागला. रसायने मिसळण्याच्या घटना वाढल्याने फेसाचा हा थर जमा होत असल्याचा उलगडा नंतर झाला. दरम्यान, मासे, पक्षी नाहीसे झाले.

नदी पुरती प्रदूषित झाल्यानंतर सुजाण नागरिक एकत्र आले. डॉ. तेज राजदान त्यात अग्रेसर होते. नदी स्वच्छतेचा ध्यास त्यांनी घेतला. अरविंद सिंघल, अनिल मेहता आदींसह कार्यकर्त्यांची फौज तयार केली. जलपर्णी खाणाऱ्या जिवाणूंची पैदास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याच दरम्यान ‘सेरी’ या संस्थेशी त्यांचा संबंध आला आणि ‘ग्रीन ब्रिजेस’ तंत्रज्ञानाचे प्रयोग सुरू झाले.

विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे मरणासन्न अवस्थेत गेलेल्या नद्यांमधील मासे, माशांवर जगणारी इतर प्राणिसृष्टी, वनस्पती यांचाही नाश होत राहतो. हे पर्यावरणीय चक्र पुन्हा सुरू करणे हे ‘ग्रीन ब्रिजेस’ तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट आहे. हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, याची इत्थंभूत माहिती  गोपाळ जोशी लिखित ‘ग्रीन ब्रिजेस’ या पुस्तकात वाचावयास मिळते. ‘राष्ट्रीय जलबिरादरी’चे संस्थापक डॉ. राजेंद्रसिंह यांची या पुस्तकाला  प्रस्तावना लाभली आहे.

मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org