सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्व प्रकारच्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला स्वास्थ्य सेवा पुरवत असताना निर्माण होत असलेल्या कचऱ्याची हाताळणी व विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यात यावी आणि यासाठी वेगळे नियम करून ते संपूर्ण देशात लागू करावेत असे आदेश केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने दिले. त्यानुसार पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या अंतर्गत २७ जुलै १९९८ मध्ये रुग्णालयीन/ जैववैद्यकीय घनकचरा (हाताळणी व व्यवस्थापन) नियम, १९९८ लागू केले. या नियमांमध्ये रुग्णालये, लहान-मोठे दवाखाने, दंतोपचार करणारे दवाखाने, रोगनिदान करण्यासाठी असलेल्या पॅथॉलॉजी लॅब्ज, औषधनिर्मितीसाठी संशोधन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्याकडे संशोधनासाठी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे प्राणी, पशुवैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये अशा सर्व ठिकाणी विविध प्रक्रियांदरम्यान निर्माण होत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे यासंबंधी तज्ज्ञांच्या मदतीने मार्गदर्शक तत्त्वे, सूचना यांचा अंतर्भाव करण्यात आला. या सर्व आस्थापनांशी समन्वय साधणे, सर्वसंबंधित आस्थापना नियमातील तरतुदींचे पालन करत आहेत की नाही यावर देखरेख ठेवणे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कायदेभंग करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे अंतिम अधिकार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहेत.

या १९९८ च्या नियमांमध्ये एकदा २००३ साली आणि अलीकडे २०१६ साली सुधारणा करण्यात आल्या. २०१६ च्या सुधारणेत शीर्षकापासून मूळ अधिनियमांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. आता हा कायदा ‘जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम, २०१६’ असा करण्यात आला आहे. यातदेखील २०१८ आणि २०१९ साली काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

जैव-वैद्यकीय घनकचऱ्याची व्याख्या मूळ नियमानुसार पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे : ‘‘आजारी व्यक्तीचे रोगनिदान करताना, लसीकरण प्रक्रिया करताना, प्रत्यक्ष उपचार करताना निर्माण होत असलेले टाकाऊ घटक, प्राण्यांवर उपचारांदरम्यान निर्माण होत असलेले टाकाऊ घटक, औषधी निर्मिती कंपन्यांमध्ये प्राण्यांवरील संशोधनादरम्यान निर्माण होत असलेले टाकाऊ घटक अशा प्रकारच्या कचऱ्याला जैव-वैद्यकीय कचरा म्हणजेच ‘बायो-मेडिकल वेस्ट’ असे संबोधण्यात यावे.’’

या व्याख्येनुसार जैव-वैद्यकीय कचऱ्यात दवाखाने व रुग्णालयांत उपचार घेण्यास जाणाऱ्या रुग्णांच्या हाता/पायावर झालेल्या जखमांची ‘मलमपट्टी’ म्हणजेच ‘ड्रेसिंग’साठी वापरलेले कापूस, मलम, रक्ताने माखलेला कापूस तसेच शस्त्रक्रियेतून बाहेर काढलेले शरीराचे अनावश्यक भाग, मुदत संपलेली औषधे, एकदाच वापरण्यायोग्य असलेली प्लास्टिकची साधने व सुया, चाकू, ब्लेड, कात्र्या अशी धातूची विविध उपकरणे यांचा समावेश होतो.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org