श्रुती पानसे

मुलांना आनुवंशिकतेतून काय मिळालं आहे आणि परिसराचा काय परिणाम झाला आहे, या दोन्ही गोष्टींचा संबंध मुलांच्या विकासाशी असतो. पौगंडावस्थेतल्या वयात ‘स्व’ची प्रकर्षांने जाणीव होऊ लागलेली असते. या टप्प्यावर मुलं-मुली अशी काही वागतात; जशी ती यापूर्वी वयाच्या कोणत्याच टप्प्यात कधीही वागलेली नसतात आणि वयाचा हा टप्पा गेल्यावरही वागणार नसतात. त्यांचं या वयातलं वागणं वेगळं आणि वैशिष्टय़पूर्ण असतं.

काही मुलं या टप्प्यावर अंतर्बा बदलून जातात. त्यामुळे पालकांचाही गोंधळ उडणं स्वाभाविक असतं. आपल्या मुलाला / मुलीला नक्की काय झालंय, याची चिंता वाटायला लागते. हा पूर्ण बदल काही पालकांना स्वीकारता येत नाही. ते नेहमीसारखे आणि सवयीनुसार वागत असतात.

मुलग्यांच्या संदर्भात बोलायचं तर तो स्वावलंबी व्हायला लागतो. तो मोठा होतोय हे छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून दिसून येतं. आपण मोठे ‘होत’ आहोत, असं त्याला वाटत नसतं, तर उलट आपण मोठे ‘झालो’ आहोत, याची पक्की खात्री असते. इतरांनी आपल्याला मोठं समजावं, अशी अपेक्षा असते. त्याला मनातून त्याच्या एका स्वतंत्र जगात राहावंसं वाटतं. त्यात आई-बाबांच्या सततच्या सूचना म्हणजे कर्कश्श त्रासदायक वाटतात. या सूचनांचा विरोध करायला जावं तर समोरून आणखी शंभर सूचना येणार, ओरडा खावा लागणार, उलट बोलतो म्हणून धपाटाही बसणार, त्यापेक्षा या सूचनांकडे दुर्लक्ष करणंच इष्ट, असं तो ठरवूनही टाकतो. पालकांचा खरंच गोंधळ उडतो. आपण सूचना देतो, त्या तो पाळत नाही. पण सूचना दिल्याशिवाय चालतही नाही. मग अशा वेळी काय करायचं? ही गोंधळाची परिस्थिती असते.

मुलींचं वयात येणं कळतं, पण मुलांचं कळत नाही. मुलांमधलं टेस्टस्टेरॉनचं प्रमाण जवळपास २० टक्के वाढतं. यावरून आपल्याला काय तो अंदाज लावता येतो. या सगळ्यामुळे या वयोगटाला ‘वादळी काळ’ म्हटलं आहे. आपल्या हातून काय होतंय याचं भान वादळाला कधीच असत नाही. प्रचंड ऊर्जेमुळे ते कुठेही धडकतं. म्हणून  वयात येणाऱ्या मुलींनाच नाही तर; मुलग्यांना समजून घेऊन सावरून सांभाळून घ्यायला पाहिजे.

contact@shrutipanse.com