30 May 2020

News Flash

कुतूहल : मानवी आरोग्य आणि जैवविविधता

मानवी प्रजातीतील बहुसंख्य रोग कुपोषण, रोगजंतूंचा प्रादुर्भाव यामुळे उद्भवतात

संग्रहित छायाचित्र

मानवी आरोग्य म्हणजे निरोगी शरीर आणि मन यांचा संगम. यासाठी आवश्यक आहे ते शुद्ध हवा, निर्मळ पाणी आणि मुबलक, कसदार अन्न. आपल्या सभोवताली सळसळणारी पाने, खळाळत वाहणारे पाणी, किलबिलणारे पक्षी आणि फुलांवर बागडणारी फुलपाखरे असली की मन अधिक प्रसन्न राहते. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या लक्षावधी प्रकारच्या वनस्पती, पशू-पक्षी, कीटक, जलचर आणि त्याचप्रमाणे मानवाच्या सुदृढ पोषणासाठी आवश्यक असलेले अन्न-धान्य हे सर्व जैवविविधतेचे मूलभूत घटक आहेत. या सर्वाचा मानवी आरोग्य अबाधित राखण्यामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग आहे. अलीकडे चुकीच्या कारणासाठी चर्चेत असलेली वटवाघुळे खरे तर परागीभवनाचे, कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. निसर्गाच्या परस्परावलंबी संरचनेत असे असंख्य दुवे आहेत आणि प्रत्येक दुवा हा अंतिमत: मानवी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

मानवी प्रजातीतील बहुसंख्य रोग कुपोषण, रोगजंतूंचा प्रादुर्भाव यामुळे उद्भवतात. पृथ्वीच्या जीवावरणातील विविध परिसंस्थांमध्ये असलेल्या असंख्य वनस्पतींमध्ये तसेच प्राणीसृष्टीत या रोगांवर मात करू शकतील असे औषधी गुणधर्म आहेत. ते जगातील जवळपास ६० ते ७० टक्के लोकांना ज्ञात आहेत आणि ते जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सजग आहेत. परंतु दुर्दैवाने काही मूठभर, परंतु धनदांडग्या समूहांच्या भौतिक विकासाच्या लालसेपोटी या अतिशय बहुमोल अशा जैवविविधतेचा मोठय़ा प्रमाणात विनाश होतो आहे आणि याचे गंभीर दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. त्याचप्रमाणे शेतीसाठी रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अनावश्यक आणि अतिरेकी वापरामुळे शेतजमिनीतील अतिशय बहुमोल विविधता नष्ट होऊन पिकांची प्रत खालावली आहे आणि यातूनच कुपोषणासारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत.

एकंदरीतच निरोगी शरीर व मन यांचा संगम साधायचा असेल, तर जैवविविधता अधिक समृद्ध आणि सुदृढ करणे ही काळाची गरज आहे. आज जगभर धुमाकूळ घालत असलेला करोना विषाणू किंवा याआधी आलेले व भविष्यातदेखील येऊ  घातलेले साथीचे रोग हे अप्रत्यक्षपणे जैवविविधतेच्या विनाशामुळे उद्भवतात, हे वारंवार दिसून आले आहे. तेव्हा आपापल्या क्षमतेनुसार ही वसुंधरा विविधतेने आणि विपुलतेने समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

डॉ. विकास हजिरनीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 12:07 am

Web Title: article on human health and biodiversity abn 97
Next Stories
1 मनोवेध : सजगताआधारित मानसोपचार
2 कुतूहल : विविधता.. झाडांच्या बुंध्यांची!  
3 मनोवेध : तणावमुक्तीसाठी ध्यान
Just Now!
X