– डॉ. यश वेलणकर

‘न्यूरोलिन्ग्विस्टिक प्रोग्रामिंग (एनएलपी)’मध्ये ‘अँकिरग पॉइंट’ म्हणजे मनातील भावना बदलण्यासाठी तयार केलेला एक आधार असतो. एखादी कृती आत्मविश्वास असलेल्या स्थितीशी जोडली गेलेली आहे, ती कृती अस्वस्थता असताना जाणीवपूर्वक केली की अस्वस्थता कमी होऊन आत्मविश्वास वाढू शकतो. हास्य ही कृती असा ‘अँकिरग पॉइंट’ होऊ शकतो का? हास्य जाणीवपूर्वक सुखद स्थितीशी जोडून ठेवले आणि नंतर सुखद स्थिती नसताना हसले, तर तो आंतरिक आधार होऊ शकतो. पण निसर्गत: तो नसतो. अनेक माणसे उदास असताना चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा धारण करीत असतात. त्यामुळेच गझलकाराला ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो’ असे शब्द वापरावे लागतात. दु:ख लपवण्यासाठी हास्याचा आधार घेतला जातो, पण त्याने दु:ख दूर होत नाही. याचे कारण दु:ख कमी करावे असा मनात उद्देश नसतोच. दु:खाचे कारण काहीतरी वेगळे असते आणि ते दूर होत नाही तोपर्यंत दु:ख कमी होणार नाही, असा मनात दृढ समज असतो. त्यामुळे असे हास्य भावना बदलू शकत नाही.

पण एखादा विनोद ऐकून किंवा वाचून सहज हसायला येते. त्या वेळी उदासी कमी होते. याचसाठी विनोद आणि हास्य यांचा मानसोपचारात समावेश केलेला आहे. ‘‘‘घाबरू नका काळे, तुमचे हे पहिलेच ऑपरेशन असले तरी ते यशस्वी होईल,’’ डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून रुग्ण म्हणतो, ‘‘माझे नाव काळे नाही आहे, डॉक्टर.’’ त्यावर- ‘‘माझे नाव काळे आहे,’’ डॉक्टर बोलून गेले!’ हे वाचून तुम्हाला हसू आले तर आत्ता तुमच्या मेंदूत काय घडले हे विज्ञानाला मेंदूचे परीक्षण करून समजले आहे.

तुम्ही हे वाचत असताना मेंदूतील सर्वात पाठीमागे असणारे दृष्टी केंद्र सक्रिय असते. त्यामुळे तुम्हाला शब्द दिसतात. नंतर मेंदूच्या पुढील डाव्या भागात त्या शब्दांचा अर्थ लावला जातो. तो अर्थ समजल्यानंतर त्यामध्ये काही तरी अनपेक्षित गंमत आहे हे मेंदूच्या उजव्या अर्धगोलातील पुढील भागाला समजते. त्यामुळे तेथे सक्रियता वाढते. चेहऱ्यावर हसू फुटले असेल तर त्या स्नायूंना सक्रिय करणारा मेंदूचा भाग कृतिशील होतो. मेंदूत हे सारे भाग कृतिशील झाल्याने इतर विचारांच्या आणि भावनांच्या फाइल्स क्षीण होतात आणि उदासी काही काळ कमी होते.

yashwel@gmail.com