श्रुती पानसे

रिकाम्या जागेचा योग्य वापर करून, नीट योजना आखून कागदावर एखादं चित्र उमटतं, तर कधी एखाद्या इमारतीचा प्लॅन तयार होतो. धरण, रस्ते, पूल आकाराला येतात. अवकाश म्हणजे अंतराळ नाही तर कुठलीही मोकळी जागा. मोकळ्या जागेचा योग्य विचार ज्यांना अतिशय उत्तम पद्धतीने करता येतो, ते दृश्य-अवकाशीय बुद्धिमत्तेचे (व्हिज्युअल- स्पॅशिअल इंटलिजन्स) असतात.

केवळ कल्पना करणं आणि त्यातून, म्हणजेच काही अस्तित्वात नसताना नवी वस्तू तयार करणे, आणि ती वस्तू उत्कृष्ट असणं यासाठी ही बुद्धिमत्ता लागते. एखाद्या वस्तूत हे नवा, अत्यंत उपयुक्त बदल सुचवतात.

केवळ मनाने कल्पना करून एखादी संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे ही एक विशेष बुद्धिमत्ता आहे. चित्रकार कल्पनेनं चित्र काढतो. ते चित्र पूर्ण झाल्यावर कसं दिसेल, त्यात कोणते रंग भरले तर ते खुलून दिसतील, कोणते रंग चांगले दिसणार नाहीत, हे तो कल्पनेनंच ताडून बघत असतो आणि त्यानुसार कागदावर किंवा इतर कोणत्या माध्यमात उतरवत असतो. एखादी रिकामी जागा बघून आर्किटेक्ट किंवा इंजिनीअर त्या ठिकाणी मोठी इमारत कशी दिसेल याचं कल्पनाचित्र उभं करतात. इमारतीचं प्रवेशद्वार, उंची, एकूण मजले, जिने कुठून कसे जातील, इमारतीचा रंग हे सारं ते कागदावर उतरवतात. हळूहळू प्लॅन तयार होतो, मात्र कागदावर किंवा कॉम्प्युटरवर उतरवण्याच्या आधी ते चित्र मनात तयार असतं. ते बुद्धीने तयार केलेलं असतं.

इंजिनीअरने तयार केलेलं यंत्रदेखील आधी त्यांच्या मनात तयार झालेलं असतं. हे काम अशा माणसांमध्ये असलेली अवकाशीय बुद्धिमत्ता तयार करत असते. जागेचा वापर कौशल्याने कसा करावा हे ड्रायव्हर्सना अतिशय चांगलं कळतं. गुंतागुंतीचे रस्ते लक्षात ठेवणं, किचकट रहदारीतून, मिळलेल्या जागेतून सफाईने मार्ग काढणं हे कामही याच बुद्धिमत्तेचंच.

साध्या ‘कापडा’ चं रूपांतर ‘कपडय़ा’त करणारे वस्त्र कारागीर, फॅशन डिझायनर, मेक अप आर्टिस्ट, पाकतज्ज्ञ, विविध वस्तू निर्माण करणारे डिझायनर्स हे या बुद्धिमत्तेचे असतात. साध्या सुईपासून ते थेट रॉकेटचं डिझाईन बनवणारे संशोधक असतात. विविध कंपन्यांमध्ये काम करणारे व्हिज्युअलायझर्स असतात. चित्रकार, शिल्पकार, ड्रायव्हर्स, फोटोग्राफर्स, इंटिरिअर डिझायनर्स, अ‍ॅनिमेटर्स यांच्यात या प्रकारची बुद्धिमत्ता असते.

contact@shrutipanse.co