सुनीत पोतनीस

१० ऑक्टोबर १९४९ हा तैवानचा स्वातंत्र्यदिन! १९४९ साली चँग-कै-शेक यांनी तैवानमध्ये आपले नॅशनलिस्ट सरकार म्हणजे ‘रिपब्लिक ऑफ चायना’ स्थापन केले. त्याच वर्षी १ऑक्टोबर रोजी तिकडे चीनमध्ये माओ झेडांग यांनी आपले चिनी जनतेचे प्रजासत्ताक म्हणजे ‘पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ स्थापन केले. १९५१ मध्ये झालेल्या कराराप्रमाणे जपानने तैवानवरचे आपले स्वामित्व सोडणे अपेक्षित होते.

मात्र प्रत्यक्षात, चँग यांचे सरकार तैवानमध्ये स्थापन झाल्यावरही माओंच्या रेड आर्मीचे तैवानवर हल्ले होतच राहिले. माओ तैवानला स्वतंत्र देश मानायला तयार नव्हते. त्यांच्यामते तैवान हा चीनचाच एक प्रांत होता. प्रबळ माओच्या भितीने, धमक्यांमुळे तैवान अमेरिकेच्या संरक्षण आश्रयाला गेला. १९५० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या नौसेनेचा जंगी जहाजांचा सातवा ताफा चीन आणि तैवान मधील सामुद्रधुनीत आणून उभा केला. १९५४ साली अमेरिकन राष्ट्रपती आयसेन हॉवर यांनी तैवानबरोबर आपसातला संरक्षण करारही केला.

सुरुवातीला तैवान म्हणजे रिपब्लिक ऑफ चायनाला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता देऊन आपले सदस्यत्वही दिले होते- चीनला नाही. परंतु पुढच्या काळात चीनचा जागतिक दबदबा हळुहळू वाढू लागला आणि चीनचे अमेरिकेशी असलेले राजनैतिक संबंध सुधारू लागले. या सर्वाचा परिणाम होऊन, चीनच्या दबाव तंत्रामुळे १९७१ साली संयुक्त राष्ट्रसंघाने चीनला (पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला) मान्यता देऊन आपले सदस्य करून घेतले आणि तैवान म्हणजे ‘रिपब्लिक ऑफ चायना’ची मान्यता रद्द करून त्यांचे सदस्यत्व बरखास्त केले! चीनने मग तैवानला आपलाच प्रांत घोषित करून टाकले. पुढे चीनच्या दबावामुळे इतर अनेक देशांनी स्वत: तैवानबरोबर त्यांचे असलेले राजनैतिक संबंध तोडले.

गेल्या दोन दशकात चीन आणि तैवानमध्ये अनेक वेळा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, चीनने १२०० क्षेपणास्त्रे तैवानच्या दिशेने तोंड करून तयार ठेवली आहेत. दुसऱ्या बाजूला तैवाननेही आपले समर्थ सैन्यदल आक्रमणाला तोंड देण्यासाठी जय्यत तयार ठेवले आहे!

sunitpotnis94@gmail.com