03 June 2020

News Flash

कुतूहल : भारत जैवविविधता पुरस्कार

पुरस्कारार्थीना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि व्यक्तीसाठी रु. दोन लाख व संस्थेसाठी रु. पाच लाख रोख रक्कम देण्यात येते.

संग्रहित छायाचित्र

 

भारतातील संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ पासून देशातील जैवविविधतेच्या क्षेत्रात संरक्षण आणि संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ‘भारत जैवविविधता पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते.

जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची विविधता, परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे लक्षण आहे. आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची निर्मिती नक्की केव्हा झाली, हे जरी वैज्ञानिकांना सांगता आलेले नाही, तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर २० ते ३० कोटी वर्षांनंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत.

वैविध्यपूर्ण हवामान, स्थलरूप विज्ञान (टोपोलॉजी) आणि अधिवास असलेला भारत देश जगात सर्वात ‘वनस्पती श्रीमंत’ म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये १८ हजारांहून अधिक प्रकारच्या फुलांच्या वनस्पती आहेत. जगातील वनस्पतींच्या प्रजातींमध्ये या सहा ते सात टक्के आहेत. ही सगळी जैवविविधता टिकून राहावी यासाठी तिच्या संरक्षण-संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन मिळावे, याच उद्देशाने ‘भारत जैवविविधता पुरस्कार’ सुरू करण्यात आले. हे पुरस्कार पुढील चार उपक्रमांसाठी देण्यात येतात :

(१) संरक्षण व संवर्धन : वन्य प्रजातींचे त्याचप्रमाणे स्थानिक प्रजातींचे संवर्धन करणाऱ्या, या प्रजातींचे अधिवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. (२) जैविक संसाधनांचा शाश्वत वापर : जैविक संसाधनांचा वापर शाश्वत ठरेल असे कार्यक्षम व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला स्वतंत्रपणे हा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. (३) जैविक संसाधनांच्या वापरातून मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ करत राहणे आणि स्थानिक नागरिकांना या मोबदल्यामध्ये वाटा मिळवून देणे, यासाठी अभिनव पद्धत साकारणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. (४) जैवविविधता व्यवस्थापन समिती : स्थानिक जैविक संसाधने आणि त्यांविषयीचे पारंपरिक ज्ञान-माहिती यांचे दस्तावेजीकरण करणाऱ्या, त्याविषयी जागृती करणाऱ्या, जैवसंवर्धनाचे आणि जैव संसाधनांच्या वापराबाबत सामाजिक आणि लिंगभाव समानतेचे उत्तम प्रारूप निर्माण करणाऱ्या जैवविविधता व्यवस्थापन समितींना पुरस्कार दिला जातो.

पुरस्कारार्थीना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि व्यक्तीसाठी रु. दोन लाख व संस्थेसाठी रु. पाच लाख रोख रक्कम देण्यात येते.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 12:07 am

Web Title: article on india biodiversity award abn 97
Next Stories
1 मनोवेध : विवेकनिष्ठ मानसोपचार
2 कुतूहल : जनुके.. जैवविविधतेचे जनक!
3 मनोवेध : खेळ मांडियेला..
Just Now!
X