डॉ. राजीव चिटणीस

इसवी सनपूर्व पंधराव्या शतकात ‘लिहिलेल्या’ ऋग्वेदानुसार वर्षकाळ हा ३६० दिवसांचा होता. त्या काळी महिना हा सत्तावीस वा अठ्ठावीस दिवसांचा असायचा. याचा संबंध चंद्राच्या पुन्हा त्याच नक्षत्रात दिसण्याशी असावा. सौरवर्षांचा काळ हा सुमारे ३६५ दिवसांचा असल्यामुळे,  निर्माण होणारा फरक भरून काढण्यासाठी दर पाच वर्षांनी प्रत्येक वर्षांत एका अधिक मासाचा समावेश केला जायचा. इसवी चौथ्या शतकाच्या सुमारास ग्रीक संकल्पनांचा वापर भारतीय खगोलशास्त्रात सुरू झाला. सूर्याच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणेचा भासमान मार्ग बारा राशींत विभागला गेला. वर्षांची सुरुवात सूर्य मेष राशीत शिरल्यावर होऊ लागली. महिन्याची सुरुवात ही अमावास्येपासून (काही ठिकाणी पौर्णिमेपासून) याच सुमारास होऊ लागली असावी. अमावास्या ते अमावास्या हा चांद्रमासाचा काळ साडेएकोणतीस दिवसांचा असल्याने वर्ष हे ३५४ दिवसांचे झाले.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
venus planet transit in mee shukra transit in pisces these zodiac sign will be success all sector
शुक्र २४ एप्रिलपर्यंत मीन राशीत राहील विराजमान, ‘या’ तीन राशी होणार मालामाल?

महिन्याचा कालावधी हा जरी चांद्रस्थितीशी निगडित केला गेला, तरी त्याची सूर्यभ्रमणाशीही सांगड घातली गेली. चांद्रमास सुरू होताना सूर्य ज्या राशीत आहे, त्या राशीनुसार महिन्याचे नाव ठरते. उदाहरणार्थ, मीन राशीत सूर्य असताना सुरू होणाऱ्या चांद्रमासाचे नाव चत्र. चांद्रमासाचा सरासरी कालावधी हा सूर्याच्या एका राशीतल्या प्रवासाच्या सरासरी कालावधीपेक्षा किंचितसा लहान असल्याने, काही वेळा सूर्य एकाच राशीत असताना दोन अमावास्या येतात. अशा वेळी या अमावास्यांपासून सुरू होणारे दोन्ही महिने एकाच नावाने ओळखले जातात. असे वर्ष एकूण तेरा महिन्यांचे असते. साधारण ३३ महिन्यांनी येत असलेल्या या अधिक मासामुळे वर्ष हे सरासरी सुमारे ३६५ दिवसांचे झाले.

भारतीय पद्धतीनुसार वर्षांची सुरुवात सूर्य मेष राशीच्या ज्या आरंभिबदूशी येतो तेव्हा होते, तो बिंदू म्हणजे दीड सहस्रकापूर्वीचा वसंत संपात बिंदू होता. (सूर्य या बिंदूवर असताना ऋतुबदलाला सुरुवात होते.) हा बिंदू धिम्या गतीने सरकत आहे. परंतु आपण नेहमी वापरतो ती वार्षिक कालगणना संपात बिंदूंना स्थिर मानते. वसंत संपात बिंदू आता मीन राशीत सरकल्यामुळे, मेष राशीचा आरंभ आणि त्यामुळे वर्षांरंभ हा काही वसंत संपात बिंदूपासून होत नाही. यामुळेच तारखेनुसार येणारा संक्रांतीचा सण हा दर ७२ वर्षांनंतर एक दिवस उशिरा येऊ लागतो. अशा दिनदर्शिकेला निरयन दिनदर्शिका म्हटले जाते.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org