सुनीत पोतनीस

जपानी लोक कोरियाचा उल्लेख ‘चोसेन’ असा करतात. त्याचा अर्थ होतो ‘सकाळच्या ताजेपणाचा, प्रसन्नतेचा देश!’ इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सहस्रकात असंख्य वेळा बाह्य़ आक्रमणांनी त्रस्त झाल्याने कोरियन जनतेत एकात्मतेची भावना जोपासली गेली आहे. कोरियन जनता शेजारच्या बलाढय़ चीन, जपान, मांचुरिया आणि रशिया यांसारख्या साम्राज्यांपासून आपले संरक्षण करण्यासाठी सदैव सज्ज राहिली.

इ.स. १३९२ मध्ये यी सिआँग-गी याने तत्पूर्वीच्या गोरियो साम्राज्याचा पराभव करून आपल्या चोसून घराण्याची सत्ता कोरियावर प्रस्थापित केली. १३९६ साली त्यांनी सेऊल ही राजधानी केली. चोसून घराण्याच्या पहिल्या दोन शतकांची कारकीर्द कार्यक्षमपणे आणि शांततेची पार पडली. पण नंतर कोरियावर परकीय आक्रमणांना सुरुवात झाली, तसेच तेथील अंतर्गत शत्रूंनीही डोके वर काढले. यातील परकीय आक्रमणे जपानकडून होती. परंतु या काळात चीनच्या मिंग घराण्याचे राज्य आणि कोरियाचे सत्ताधारी चोसून यांनी ही आक्रमणे कशीबशी परतवून लावली. या कालावधीत कोरिया हा जणू काही चिनी साम्राज्याचाच एक प्रांत बनला होता. १५-१६ व्या शतकात कोरियन लोकांवर चिनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. बौद्ध धर्माचा प्रसारही चीनमधून कोरियात झाला आणि पुढे जपानमध्ये. सुरक्षेसाठी कोरिया या काळात चीनवर अवलंबून असे आणि नजराण्यांच्या स्वरूपात चीनला वेळोवेळी मोठी खंडणी देत असे.

कोरियन भाषेत एक म्हण प्रचलित आहे : ‘व्हेन व्हेल्स फाइट, श्रिम्प’स बॅक इज ब्रोकन’! अर्थात- प्रबळ, मोठे व्हेल मासे एकमेकांशी लढतात अन् कंबरडे मोडते लहान कोळंबीचे! कोरियाची विसाव्या शतकापर्यंतची परिस्थिती या म्हणीप्रमाणे तंतोतंत होती. चीन हा त्या काळात ईशान्य आशियातला सर्वाधिक संपन्न, समर्थ देश. त्याचा कोरियावर नेहमीच वरचष्मा आणि प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे चीनचे मोठे स्पर्धक जपान, रशिया आणि अगदी अमेरिकासुद्धा आपला कोरियावरचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्नरत राहिले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या स्पर्धकांमधून चीन बाहेर पडला. त्या काळात पूर्व आशियात आपल्या वसाहती वाढवून व्यापारी लाभ मिळवण्याच्या ईर्षेने ब्रिटन, फ्रान्ससुद्धा कोरियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या खटपटीला लागले.

sunitpotnis94@gmail.com