– सुनीत पोतनीस

दुसऱ्या महायुद्धात जपान हा दोस्तराष्ट्रांच्या विरोधी (अ‍ॅक्सिस) आघाडीत होता. युद्धाच्या धामधुमीत जपानी साम्राज्याने सिंगापूरसह सर्व मलाय द्वीपकल्पावर आक्रमण करून त्यावर कब्जा केला. या युद्धात जपानने दोस्तराष्ट्रांचे एक लाख ३० हजार सैनिक युद्धबंदी केले. जपानचा सिंगापूरवरचा अंमल पुढे १९४२ ते १९४५ अशी चार वर्षे राहिला. जपान्यांनी सिंगापूरचे नाव बदलून ‘स्योनान तो’ म्हणजे दक्षिणद्वीपातला प्रकाश असे केले.

दुसऱ्या महायुद्धात जपान्यांचा पराभव झाल्यावर, सिंगापूरचा ताबा पूर्ववत ब्रिटिशांकडे आला. गेल्या चार वर्षांंत जपान्यांच्या अंमलकाळात सिंगापूरच्या जनतेची परिस्थिती फार खालावली होती, उद्योगधंदे बहुतांश बंद पडलेले, अन्नधान्याचा तुटवडा, बेरोजगारी यांनी सिंगापुरात अराजक माजलेले. दुसरे म्हणजे जपान्यांपासून ब्रिटिश राज्यकर्ते आपले संरक्षण करू शकले नाहीत, त्यामुळे ब्रिटिश हे समर्थ शासक नसल्याची भावना रहिवाशांत बळावली.

युद्धकाळ आणि नंतरच्या दशकात सिंगापुरी जनतेत एक प्रकारची राजकीय जागृती निर्माण झाली, स्वातंत्र्याचे वारे वहायला लागले. इंग्रजांच्या वसाहतराजला विरोध करणारे, त्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवून आपलेच स्वायत्त सरकार सिंगापूरात यावे असा प्रयत्न करणारे अनेक गट तयार झाले. ‘मर्डेका’ (मलाय भाषेत, ‘स्वातंत्र्य’) ही त्यांची परवलीची घोषणा तयार झाली. या काळात मलाया, सिंगापूरची अर्थव्यवस्था ढासळत होती. परंतु युद्धोत्तर काळात सिंगापुरात विपुल मिळणारे टीन आणि रबर यांना मोठी जागतिक मागणी आली आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत थोडी सुधारणा झाली.

सिंगापुरातली अशांतता आणि आंदोलने यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ब्रिटिश सरकारने सिंगापूरवासियांना टप्प्याटप्प्याने स्वयंशासन देण्याचा विचार सुरू केला. त्यासाठी विधानपरिषद बनवून त्याचे २५ सदस्य तयार केले. पहिली सदस्य निवडणूक २५ पैकी ६ जागांसाठी घेतली गेली. या सहा जागांपैकी तीन जागा एसपीपी या पक्षाला तर तीन जागा अपक्षांना मिळाल्या. पुढची निवडणूक १९५१ मध्ये घेतली गेली. तर तिसरी निवडणूक १९५५ साली घेतली गेली. या निवडणुकीत कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर लेफ्ट लेबर फ्रंट या पक्षाने दहा जागा जिंकल्या. दुसऱ्या एका पक्षाबरोबर युती करून ते सत्तेवर आले. यावेळी  पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी या नवीन, डाव्या विचारसरणीच्या पक्षाने तीन जागा मिळवल्या.

sunitpotnis94@gmail.com