– डॉ. यश वेलणकर

माणसांना शोकांतिका किंवा ‘दर्दभरी’ गाणी का आवडतात, याचे संशोधन मेंदूविज्ञानातही होत आहे. पडद्यावर किंवा गाण्यातील व्यक्ती रडताना पाहून ‘मिरर न्यूरॉन’ सक्रिय झाल्याने प्रेक्षकांनाही रडू येते. या वेळी मेंदूत ‘प्रोलॅक्टिन’ नावाचे रसायन पाझरते. हे रसायन वात्सल्याशी निगडित आहे. बाळ रडू लागले किंवा प्रिय व्यक्ती दु:ख भोगते आहे याची जाणीव झाली की ते पाझरते. शोकांतिका पाहताना रडू आल्यानेही हे रसायन पाझरते; पण त्या वेळी ‘हे दु:ख माझे नाही’ याचेही भान असते. त्यामुळे साक्षीभावाने मायेच्या उमाळ्याचा अनुभव येत असल्याने प्रेक्षक पैसे खर्च करून रडायला जातात, असा सिद्धांत डेव्हिड ह्य़ुरॉन यांनी मांडला आहे. मात्र माणसांना संथ सुरातील दर्दभरी गाणी का आवडतात, याचे उत्तर या सिद्धांतानुसार मिळत नाही. कारण अशी गाणी ऐकत असताना फारसे रडू फुटत नाही. त्या वेळी मेंदूत ‘प्रोलॅक्टिन’ रसायनही पाझरत नाही.

त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर, मेंदूमध्ये अशी गाणी ऐकत असताना काय घडते याची तपासणी करून शोधण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये आढळले की, कोणतीही गाणी ऐकताना त्यातील भावनांचा परिणाम मेंदूत दिसून येतो. हलकीफुलकी, उडत्या चालीची गाणी मेंदूतील ‘न्यूक्लीअस अकुम्बन्स’ नावाच्या भागाला उत्तेजित करतात. मेंदूतील हा भाग ‘प्लेजर सेंटर’ म्हणून ओळखला जातो. तो उत्तेजित होतो तेव्हा छान वाटते. त्यामुळे ही गाणी  ऐकत राहावीशी वाटणे स्वाभाविक आहे.

पण शांत सुरातील विरहगीते ऐकताना हा भाग सक्रिय होत नाही. म्हणजे ‘फील गुड’ भाव या गाण्यांमुळे निर्माण होत नाही. याउलट अशी गाणी ऐकताना मेंदूतील ‘डेंजर सेंटर’ म्हणजे ‘अमीग्डला’ सक्रिय होतो. तसेच ‘प्री फ्रण्टल’शी जोडणारा आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा ‘अ‍ॅण्टेरिअर सिंग्युलेट कॉर्टेक्स’ आणि त्याचबरोबर स्मरणशक्तीशी निगडित ‘हिप्पोकॅम्पस’ हे भागही सक्रिय होतात. म्हणजेच ही गाणी ऐकणाऱ्याला त्याच्या आयुष्यातील काही घटना आठवू लागतात; त्या जागृत मनात जाणवत नसल्या, तरी मेंदूत वैयक्तिक स्मृतीशी संबंधित भाग सक्रिय झालेला दिसतो. ‘डिप्रेशन’ असलेल्या व्यक्तींना अशी गाणी ऐकवल्यानंतर त्यांचा हा भाग डिप्रेशन नसलेल्या व्यक्तींपेक्षा अधिक कृतिशील होतो. गाणे संपल्यानंतर तो शांत होतो. त्यामुळे अशी गाणी ऐकावी असे वाटणे याचे मूळ आपल्या शरीरमनात समतोल स्थिती साधली गेल्याने वाटणाऱ्या आनंदात आहे.

yashwel@gmail.com