कर्नाटकमधील ‘लेकमॅन’ म्हणून ओळखले जाणारे कामेगौडा. वयोमान फक्त ८५ वर्षे! मागील चार दशकांच्या काळात कामेगौडा यांनी त्यांच्या भागातील प्राणी-पक्ष्यांसाठी तब्बल १६ तलाव एकटय़ाने बांधले आहेत. कर्नाटकच्या मंडय़ा जिल्ह्य़ातील डासनाडोड्डी या लहानशा खेडय़ात राहणारे कामेगौडा हे मेंढपाळ असून तिथून जवळच्या कुंदिनीबेट्टा या डोंगराळ ठिकाणी मेंढय़ा चारतात. असेच एकदा उन्हाळ्याच्या दिवसांत मेंढय़ांना भरकटताना त्यांनी पाहिले. मेंढय़ांना तहान लागली होती. पण डोंगरावर कुठेच पाणी नसल्याने पाण्याच्या शोधार्थ त्या सैरावैरा धावत होत्या. ते पाहून कामेगौडा अस्वस्थ झाले.

गावात एरवी भरपूर पाऊस पडतो, तरीही मेंढय़ा आणि इतर पक्षी-प्राण्यांना प्यायला पाणी का मिळत नाही, असा प्रश्न त्यांना पडला. याचा विचार करता त्यांच्या ध्यानात आले की, पावसाचे पाणी डोंगरावर पडते, पण वृक्षतोडीमुळे डोंगर उजाड होत चालल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे आणि ते वाट मिळेल तिकडे वाहते. यामुळे जमिनीतही पाणी फारसे मुरत नाही, या रास्त निष्कर्षांप्रत ते आले.

मग कामेगौडा यांनी त्यांच्या काही मेंढय़ा विकल्या आणि त्या पैशातून आवश्यक ती अवजारे आणली. या अवजारांच्या साहाय्याने या प्राण्यांसाठी कुंदिनीबेट्टाच्या डोंगरात त्यांनी एक तळे खोदले. पावसाळ्यात त्यात पाणी साचले. मेंढय़ा त्यावर आपली तहान भागवू लागल्या. हे पाहून कामेगौडा खूप आनंदित झाले. मग त्यांनी असे आणखी छोटे तलाव बांधण्याचा निश्चय केला.

पाहता पाहता कुंदिनीबेट्टा परिसरात असे १६ तलाव निर्माण झाले. पाण्याने भरलेले हे तलाव पाहून कामेगौडा यांच्याबरोबरच इतर गावकऱ्यांचे डोळेही आनंदाने पाझरू लागले. कामेगौडा यांना इतर गावांतूनही मग तलावबांधणीबाबत मार्गदर्शनासाठी निमंत्रणे येऊ लागली. पुरस्कारही मिळू लागले. पुरस्कारांच्या रूपात मिळालेले पैसे स्वत:साठी खर्च न करता तलावबांधणी आणि डोंगरांवर झाडे लावण्यासाठी खर्च होऊ लागले.

कोणतेही शिक्षण न झालेल्या कामेगौडा यांनी जलव्यवस्थापनाचे तंत्रज्ञान केवळ अनुभवाच्या आधारे विकसित केले. एक तलाव भरला की त्यातून ओसंडणारे पाणी दुसऱ्या तलावात जाते. दुसऱ्यातून तिसऱ्यात. असे १६ तलाव भरण्याची अनोखी रचना करून त्यांनी समृद्ध जलव्यवस्थापन केले आहे. पाण्याने भरलेल्या या तलावांमुळे डोंगर व गावांचा परिसर हिरवा तर झालाच, पण त्यामुळे शेतीपूरक व्यवसायासही वाव मिळाला आहे. गावातच रोजगार उपलब्ध होऊ लागल्याने स्थलांतर कमी झाले आहे. वयाच्या ८५व्या वर्षीदेखील कामेगौडा यांची ही अथक निसर्गसेवा नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org