सुनीत पोतनीस

स्वतंत्र उत्तर कोरियाच्या अध्यक्षपदी सध्या किम इल-सुंग यांचा नातू किम जोंग उन आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर २८ डिसेंबर २०११ रोजी किम जोंगने उत्तर कोरियाचे शासन ताब्यात घेऊन तिथे हुकूमशाही अंमल सुरू केला. १९४८ मध्ये उत्तर कोरियात जे सरकार स्थापन झाले ते सोव्हिएत रशियाच्या आशीर्वादाने- अर्थात कम्युनिस्ट विचारप्रणालीचे. उत्तर कोरियाचे नेते आपल्या राष्ट्राला आत्मनिर्भर कम्युनिस्ट राष्ट्र म्हणवून घेतात. तिथे औपचारिक निवडणुकाही होतात. पण तो दिखावाच असतो.

जागतिक राजकीय निरीक्षकांच्या मते, उत्तर कोरियाचे सरकार हे हुकूमशाही, अधिनायकवादी सरकार आहे. कारण देश स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत किम इल-सुंग यांचे घराणे व त्याच्या वारसांचेच अधिपत्य आहे. सत्तारूढ घराण्यातील सदस्यांच्या मर्जीनुसारच उत्तर कोरियाची श्रमिक पार्टी (डी. पी. के.) देशाचा कारभार चालवते. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अहवालांनुसार, मानवाधिकारांचे उल्लंघन उत्तर कोरियाइतके जगात कुठेही नाही.

उत्तर कोरिया सरकारचे नाव जरी ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ असे असले तरी राजकीय निरीक्षक तिला ‘पिढीजात हुकूमशाही राजवट’ वा ‘स्टालिनवादी हुकूमशाही’ म्हणतात! ‘वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया’ या एकल पक्षाची सत्ता असलेल्या सरकारात किम जोंग उन आणि त्याच्या नातेवाईकांचेच नेहमी वर्चस्व असते.

कट्टर निधर्मी असलेला हा अण्वस्त्रसंपन्न देश आहे. किम जोंग-उन सत्तेत आल्यापासून ‘सौंगून’- ‘सैन्यबळ प्रथम’ या नीतीचा अवलंब करतो. त्याचे बारा ते तेरा लाखांचे सैन्य आहे. इतके मोठे सैन्य असणारा उत्तर कोरिया हा चीन, अमेरिका व भारतानंतरचा चौथा देश आहे. सर्व मोठय़ा उद्योग-व्यवसायांचे राष्ट्रीयीकरण झालेल्या या देशात सरकारी समूह शेती केली जाते. उत्तर कोरियाचा रशियाबरोबर ६० टक्के आणि चीनबरोबर ३० टक्के निर्यात व्यापार आहे. उत्तर कोरियाला १९९१ साली संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले. आजही, किम जोंग-उनच्या सक्त बंधनाखालील या देशात सरकारी पोलादी पडद्याआड घडलेल्या घटना क्वचितच बाहेर जगासमोर येतात!

sunitpotnis94@gmail.com