संदेशन साध्य होण्यासाठी हेतू, प्रेषक, ग्राहक, माध्यम, संदर्भ, संदेश आणि संदेशसंहिता हे घटक आवश्यक असतात. उदाहरणार्थ, वसंतातील नर-कोकीळ प्रजननासाठी योग्य जोडीदाराचा शोध घेण्याच्या हेतूने गाणे गाऊन संदेश पाठवत असतो. प्राणीसृष्टीतील अप्रगत प्रजातींची संदेशविविधता मर्यादित असते, तर प्रगत प्रजातींमध्ये अधिक असते. पण अधिसंदेशनाद्वारे ती अधिक वाढविता येते. मर्यादित संदेशांच्या विवक्षित संयोजनाने (कॉम्बिनेशन) अर्थाचे आविष्करण गुणित करता येते. अशा संयोजनक्षमतेमुळे प्राण्यांमध्ये भाषेची निर्मिती होते.

कार्ल फ्रिश या शास्त्रज्ञाने मधमाश्यांच्या भाषेची उकल केल्याने त्यास १९७३ साली नोबेल पारितोषिक मिळाले. मधमाश्यांच्या पोळ्यातील टेहळणी करणाऱ्या माश्या त्यांना सापडलेल्या मधाच्या साठय़ाची माहिती ‘ठुमका नृत्या’तून (वेगल डान्स) इतर कामगार माश्यांना देत असतात. या संदेशन पद्धतीचे मानवी भाषेशी मोठे साधर्म्य आहे. ज्याप्रमाणे आपण भिन्न ठिकाणी आणि वेगवेगळ्या काळी घडलेल्या घटनांविषयी बोलतो, तसेच मधमाश्या त्यांना पोळ्यापासून दूर व वेगळ्या वेळी आढळलेल्या अन्नसाठय़ाची माहिती देतात.

ठुमका नृत्यात माशी इंग्रजी आठ (8) या अंकाआकारात उदर (अ‍ॅबडॉमेन) डावी-उजवीकडे हेलकावत नाचते. यातील समाईक मध्य धावेची (कॉमन सेण्ट्रल रन) लांबी अन्नसाठय़ाचे पोळ्यापासून अंतर, तर त्याचा सूर्याच्या स्थितीच्या संदर्भात कोन, त्याची दिशा विदीत करते. या धावेच्या शेवटी माशी एकदा एकीकडे तर एकदा दुसरीकडे वळसा घेत पुन्हा मध्य धावेकडे येते. या धावेवर किती ऊर्जेने ठुमके घेतले जातात, यावर अन्नसाठय़ाची विपुलता ठरते आणि त्यानंतर एक ध्वनिस्फोट केला जातो, ज्याच्या वारंवारतेवरून अन्नाची विपुलता व अंतराचे आकलन कामगार माश्यांना होते.

तसेच प्राण्यांच्याही अधिसंदेशनात दुय्यम संकेतांमुळेही होते. दोन वा अधिक संदेशांच्या संयोजनाने वाक्यरचना होऊन मर्यादित विन्यासांनी (डिस्प्ले) विविध अर्थ तयार होऊ शकतात. झेब्रामध्ये ध्वनिसंकेतांव्यतिरिक्त कानांचे डोक्याजवळ आणणे वैमनस्य, तर दूर नेणे मित्रत्वाचे संकेत देते. श्वानकुलातील प्राणी मस्तक तुकवून, तर वानर जबडा सैल सोडून आपली कृती बतावणीची किंवा नाटकी आहे हे सुचवतात.

प्राण्यांमधील संदेशनाचे यथोचित ज्ञान झाल्याने आपल्याला जैवविविधतेचे आणि वन्यजीवांचे संरक्षण-संवर्धन अधिक परिणामकारक पद्धतीने करता येईल.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org