– डॉ. यश वेलणकर

जन्माला आल्यापासून तीन-चार वर्षे होईपर्यंत कोणते प्रसंग घडले होते, ते माणसाला आठवत नाहीत. कारण त्या स्मरणशक्तीसाठी आवश्यक असलेले मेंदूचे भाग तेव्हा विकसित झालेले नसतात. मात्र त्या काळात जे काही घडलेले असते, त्याचा परिणाम शरीर-मनावर झालेला असतो. याच काळात माणूस चालायला, बोलायला शिकतो. हे शिकण्यासाठीही स्मरणशक्ती आवश्यक असते. त्या स्मरणशक्तीस ‘अव्यक्त स्मरणशक्ती’ (इम्प्लिसिट मेमरी) म्हणतात. ही स्मरणशक्ती आयुष्यभर आपल्याला सोबत करते. वार्धक्यात ‘अल्झायमर’ आजाराचा पहिला परिणाम ‘व्यक्त स्मरणशक्ती’वर (एक्सप्लिसिट मेमरी) होतो. पण अव्यक्त स्मरणशक्ती खूप दिवस तग धरून राहते. ती शब्दांत व्यक्त करता येत नाही. उदाहरणार्थ, दोनचाकी वाहन चालवता येण्यासाठी त्यावर तोल सांभाळायला शिकावे लागते. तोल सांभाळण्यासाठी नक्की काय करायचे, हे शब्दांत मांडणे कठीण आहे. पण माणूस ते शिकतो. एकदा ते शिकल्यानंतर, दहा वर्षे ते वाहन चालवले नाही तरी तोल सांभाळणे पुन्हा शिकावे लागत नाही. ते आपल्या मेंदूत, संपूर्ण शरीरात साठवलेले असते. माणूस सवयीने जे काही करतो ते अव्यक्त स्मरणशक्तीमुळे असते. वर्तन चिकित्सेतील ‘प्रोग्रामिंग’ म्हणजे अव्यक्त स्मरणशक्ती असते, हे पुढे संशोधनात स्पष्ट होऊ लागले. ही अव्यक्त स्मरणशक्ती शरीरातील स्नायूंमध्येही असते. तिला ‘मसल मेमरी’ म्हणतात. कोणत्याही खेळात/ नृत्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी ही स्नायूंची स्मरणशक्ती विकसित करावी लागते. त्यासाठी सराव आवश्यक असतो. एखादी कृती पुन:पुन्हा केली की अव्यक्त स्मरणशक्ती विकसित झाल्याने सहजतेने होऊ लागते. आपण बोलताना जे उच्चार करतो, हेल काढतो, वेगवेगळ्या शब्दांवर जोर देतो हे अव्यक्त स्मरणशक्तीमुळेच होते. ही स्मरणशक्ती भावनांशीही संबंधित आहे. माणसाच्या भावनिक प्रतिक्रिया या अव्यक्त स्मरणशक्तीमुळे असतात. ‘हायपोथॅलॅमस’ हा व्यक्त स्मरणशक्तीशी संबंधित मेंदूतील भाग जन्मानंतर तीन वर्षांनी सक्रिय होत असला, तरी ‘अमीग्डला’ हा भावनांशी संबंधित भाग जन्मापासून कार्यरत असतो. पहिल्या तीन वर्षांत जे घडले ते आठवत नसले, तरी त्याची आठवण ‘अमीग्डला’त राहते. ‘फोबिया’ म्हणजे ठरावीक भीतीचे एखादे कारण या काळात घडलेले असू शकते. अव्यक्त स्मरणशक्ती प्रयत्नपूर्वक बदलून ‘फोबिया’ बरा करता येतो.

yashwel@gmail.com