पर्यावरणीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून खारफुटीची जंगले हा सागरी किनारपट्टीवरील वातावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. ही जंगले पाणी शुद्ध करणारी किनारी परिसंस्थेची (कोस्टल इकोसिस्टीमची) जणू मूत्रपिंडेच आहेत. मँग्रोव्ह म्हणजे छोटी झुडपे ते उंचच उंच वृक्ष अशा अनेकविध वनस्पतींचे एकत्रीकरण आहे. सुंदरबनसारखे त्रिभुजप्रदेश, खाडय़ा यांसारख्या क्षारयुक्त किंवा खारट पाण्यात या वनस्पती वाढतात. जवळचे समुद्र आणि जमीन यांना जोडणारी एक मुक्त पर्यावरणीय प्रणाली म्हणून खारफुटींचे विशेष महत्त्व आहे. ही जंगले स्थलीय आणि सागरी परिसंस्था यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. या खाऱ्या पाण्यातून आणि सेंद्रिय गाळातून (डेट्रिटस) अविरतपणे मिळणाऱ्या पोषक द्रव्यांमुळे खारफुटी परिसंस्थांची (मँग्रोव्ह इकोसिस्टीम) उत्पादनक्षमता इतर परिसंस्थांच्या कैक पटीने अधिक जास्त असते. शिवाय या गाळामुळे तयार झालेली दलदल ही मासे आणि कोळंबी यांच्या असंख्य प्रजातींसाठी प्रजनन तसेच शिशुसंवर्धन केंद्र (नर्सरी ग्राउंड) अशी दुहेरी व्यवस्था उपलब्ध करून देते.
किनारपट्टीचा विस्तार वाढविण्यामध्ये आणि बेटांचे नैसर्गिकरीत्या ‘बांधकाम’ करण्यातही खारफुटीचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे, तसेच अतिवृष्टीमुळे येणारे महापूर, चक्रीवादळे त्सुनामीच्या लाटा यांपासून तटबंदीचे संरक्षण करणे हेदेखील खारफुटीचे महत्त्वाचे कार्य आहे. किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेतही या परिसंस्थेचे मोठे योगदान आहे. माशांच्या विशिष्ट प्रजाती प्रदेशनिष्ठ असल्याचेदेखील दिसून येते. भारतामध्ये पूर्व किनारपट्टीवर ३३०, अंदमान आणि निकोबारमध्ये २४९ आणि पश्चिम किनाऱ्यावर १२४ प्रजाती आढळून आल्या आहेत. सर्वात मोठा खारफुटीचा भाग असलेल्या दक्षिण पूर्व आशियातील कोरॉन क्षेत्राच्या एक चौरस किलोमीटर क्षेत्रातील प्रदेश हा ‘बायोस्फीअर रिझव्र्ह’ म्हणून संरक्षित असून स्थानिक लोकांना यातून मोठय़ा प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो. यावरून या जंगलांचे नगदी आर्थिक महत्त्व अधोरेखित होते. गुरांची चराऊ कुरणे, मध उत्पादन, काला आझार व तत्सम स्थानिक गंभीर आजारांवर औषध असेही या बहुगुणी वनस्पतींचे फायदे आहेत.
थोडक्यात, किनारपट्टीवरील सर्व प्राणिमात्रांना अन्न-पाणी-निवारा या जीवनावश्यक सुविधा पुरविणारी खारफुटी ही अत्यंत महत्त्वाची जीवसंपदा आहे. अशा प्रकारे खारफुटी वनस्पती मानवासाठी पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक, आरोग्यरक्षण आदी बहुविध स्तरांवर लाभ मिळवून देणारी संजीवनी आहे असे म्हटले तर उचित ठरेल. या जंगलांना राखणे ही पर्यावरणाचा जबाबदार घटक या नात्याने आपणा सर्वाची नैतिक गरज आहे.
– डॉ. गीतांजली देशमुखे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 12:07 am