डॉ. नागेश टेकाळे

वनस्पती आणि ऑक्सिजनचा संबंध इंग्लिश वैद्यकतज्ज्ञ जोसेफ प्रिस्टली याच्या १७७०च्या सुमारास केलेल्या प्रयोगांतून सिद्ध झाला होता. वनस्पतींद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जात असल्याचे प्रिस्टलीने ओळखले होते. डच वैद्यकतज्ज्ञ जान इंजेनहाऊझ याने याच काळातील आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यात प्रिस्टलीचे प्रयोग पुढे चालू ठेवले. इ.स. १७७९ सालच्या एका प्रयोगात त्याने काही वनस्पती एका काचेच्या भांडय़ात पाण्याखाली बुडवून ठेवल्या. हे भांडे सूर्यप्रकाशात ठेवल्यावर, या वनस्पतीच्या हिरव्या पानांतून वायूचे बुडबुडे येऊ लागले. भांडे अंधारात ठेवल्यानंतर मात्र बुडबुडे येणे थांबले. सूर्यप्रकाशात असताना वनस्पतींच्या फक्त हिरव्या भागातून निर्माण होणारा हा वायू इंजेनहाऊझने गोळा केला आणि त्यात अर्धवट जळत असलेली मेणबत्ती ठेवली. या मेणबत्तीने झटकन पेट घेतला. यावरून हे बुडबुडे नुकत्याच शोधल्या गेलेल्या ऑक्सिजनचे असल्याचे स्पष्ट झाले.

जीन सेनेबिअर या स्वीस वनस्पतीशास्त्रज्ञाने १७८२ साली, इंजेनहाऊझने केलेल्या प्रयोगाचा पुढचा टप्पा गाठला. उकळून थंड केलेल्या पाण्यात विरघळलेल्या कार्बन डायऑक्साइडचा अभाव असतो. हिरव्या वनस्पती जर अशा उकळून थंड केलेल्या पाण्यात ठेवल्या, तर त्या ऑक्सिजन निर्माण करू शकत नसल्याचे सेनेबिअरला दिसून आले. याउलट कार्बन डायऑक्साइडने संपृक्त (सॅच्युरेटेड) केलेल्या पाण्यात हिरव्या वनस्पतींकडून ऑक्सिजनची निर्मिती अधिक जोमाने होत असल्याचे त्याला आढळले. जीन सेनेबिअरच्या मते ऑक्सिजनची निर्मिती पाण्यात विरघळलेल्या कार्बन डायऑक्साइडद्वारे होत होती.

निकॉलास दी सॉशर या मूळ फ्रेंच असणाऱ्या जिनेव्हा येथील वनस्पती शास्त्रज्ञाने या प्रयोगांची मालिका पुढे चालू ठेवली. इ.स. १८०४ मध्ये केलेल्या प्रयोगात त्याने काचेच्या हवाबंद पात्रामधील वनस्पतींना काही काळासाठी नियंत्रित पद्धतीने कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचा पुरवठा केला. त्यानंतर वनस्पतींच्या वाढलेल्या वजनाची तुलना त्याने, वनस्पतींना पुरवलेल्या कार्बन डायऑक्साइड व पाण्याच्या वजनाशी केली. वनस्पतीच्या वजनातील वाढ ही फक्त कार्बन डायऑक्साइडमुळे होत नसून त्यात पाण्याचाही सहभाग असल्याचे सॉशरच्या प्रयोगातून दिसून आले. प्रिस्टली, इंजेनहाऊझ, सेनेबिअर आणि सॉशर यांनी केलेल्या या सर्व प्रयोगांतून झाडाची वाढ होण्यास सूर्यप्रकाश, वनस्पतींतील हरित द्रव्य, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी या घटकांची आवश्यकता असल्याचे सिद्ध होऊन वनस्पतींत होणाऱ्या प्रकाशसंस्लेषण क्रियेच्या भावी संशोधनाचा पाया घातला गेला.

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org