-डॉ. यश वेलणकर 

माणसाला आत्मभान (इनसाइट) असेल तरच कोणतीही मानसोपचार पद्धती उपयोगी असते. मानसिक त्रासांचे पूर्वी दोन प्रकारांत वर्गीकरण केले जात असे. आपल्याला त्रास आहे असे व्यक्ती मान्य करीत नाही, पण तिचे वर्तन स्वत:ला आणि इतरांनाही त्रासदायक असते. त्यास ‘सायकोसिस’ म्हणत असत. ‘न्युरोसिस’मध्ये त्या व्यक्तीला त्रास आहे याचे भान असते आणि तो त्रास कमी करायचा असतो. अशा वेळी मानसोपचार उपयोगी ठरतात. इनसाइट नसेल तर- म्हणजे सायकोसिस असताना- मनोविकारतज्ज्ञाकडून औषधे किंवा अन्य उपचार घ्यावे लागतात.

आता पूर्वीचे वर्गीकरण बदलून जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याची व्याख्या ठरवताना त्याचे तीन निकष निश्चित केले आहेत. या तीनपैकी कोणताही एक निकष कमी असतो, त्या वेळी त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही असे म्हणतात. त्यातील पहिला निकष म्हणजे, वास्तवाची सुसंगत जाणीव होणे हा आहे. अशी जाणीव असते त्या वेळी त्या व्यक्तीला तिचे नाव-गाव, आपण कोठे आहोत, काय करीत आहोत याचे भान असते. ती व्यक्ती जे काही पाहते, ऐकते, अनुभवते त्याचा तिने लावलेला अर्थ सुसंगत असतो. वास्तवाचे भान सुसंगत नसते तेव्हा ‘स्किझोफ्रेनिया’ नावाचा आजार असू शकतो. रस्त्यावर फाटक्या कपडय़ात फिरणारे, आपले नाव-गाव सांगू न शकणारे बऱ्याचदा या आजाराचे रुग्ण असतात. या रुग्णांना योग्य उपचार मिळाले तर त्यांचा आजार कमी होतो.

‘स्किझोफ्रेनिया’ला मराठीत ‘छिन्नमनस्कता’ म्हणतात. याचे कारण त्या रुग्णांना जो अनुभव येतो, जाणीव होते, ती सुसंगत नसते, छिन्नभिन्न असते. असा आजार झालेली व्यक्ती हातात लाडू घेऊन खात असेल तर दोन घास खाल्ल्यानंतर अचानक तिला आपल्या हातात दगड आहे असे वाटते आणि ती तो फेकून देते. वास्तवाची सुसंगती बिघडल्यामुळे असे होते. हा आजार असलेल्या व्यक्तीला आपल्याशी देव, मृत व्यक्ती किंवा वस्तू, झाडे बोलतात असे वाटते. त्यांचे आवाज त्यांना ऐकू येतात, तशी दृश्ये त्यांना दिसतात. या आजाराचे अधूनमधून झटके येऊ शकतात. या आजाराचे अनेक प्रकार आहेत आणि वैद्यकीय उपचारांनी हा आजार आटोक्यात ठेवता येतो. आत्मभान विकसित झाले, की या आजारातही मानसोपचार उपयोगी ठरतात.

yashwel@gmail.com