डॉ. यश वेलणकर

‘सिग्नेचर’ म्हणजे स्वाक्षरी; ती जशी प्रत्येकाची वेगळी असते, तसेच प्रत्येक माणसातील गुण आणि कौशल्ये यांचा एकत्रित परिणाम वेगळा असतो. त्याला ‘सिग्नेचर स्ट्रेंग्थ’ म्हणतात. कौशल्ये दोन प्रकारची असतात. ‘हार्ड स्किल्स’ म्हणजे माणसाला त्याच्या व्यवसायात उपयोगी पडणारी कौशल्ये. तर ध्येयनिश्चिती, नियोजन करणे, तणाव व्यवस्थापन अशी काही कौशल्ये आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात. त्यांना ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणतात. काही जणांकडे नृत्य, गायन, वादन, चित्रकला, लेखन अशीही कौशल्ये असतात. प्रत्येकात यांतील किंवा यापेक्षा वेगळी काही ना काही कौशल्ये असतातच.

आपल्यात कोणतेच कौशल्य नाही, असे वाटणे हे औदासीन्याचे लक्षण आहे. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार शब्द, अंक, आकार, ध्वनी, शारीरकृती, स्वव्यवस्थापन, इतरांचे व्यवस्थापन आणि निसर्ग अशा आठ बुद्धी असतात. प्रत्येक माणसात चार-पाच बुद्धी चांगल्या असतात, तीन-चार दुबळ्या असतात. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वातील गुणसुद्धा निरनिराळे असतात. कुणी अंतर्मुख असतो, तर कुणाला सतत माणसांत रमायला आवडते. कुणी एकटय़ाने चांगले काम करू शकते, तर कुणात संघभावना अधिक असते.

प्रत्येकाची मूल्येही निरनिराळी असतात. मूल्ये म्हणजे महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी; जे मिळवण्यासाठी माणूस धडपडतो ती मूल्ये! सत्ता, संपत्ती, कीर्ती, उपभोग, स्व-ओळख, सौंदर्य, स्वच्छता, स्थैर्य, सुरक्षितता, नावीन्य, स्वातंत्र्य, विकास, ज्ञान, आरोग्य, नातेसंबंध, आध्यात्मिक प्रगती अशी अनेक मूल्ये आहेत. माणसाला त्याची मूल्ये कोणती आहेत, हे उमजले असेल तर निर्णय घेणे सोपे जाते. मूल्ये ही दिशादर्शक असतात. ‘सिग्नेचर स्ट्रेंग्थ’ म्हणजे कौशल्ये, गुण, बुद्धी, शारीर प्रकृती आणि मूल्ये यांचा एकत्रित विचार होय. या ‘सिग्नेचर स्ट्रेंग्थ’ लक्षात घेऊन आयुष्याच्या विविध टप्प्यांतील ध्येय ठरवले, तर माणूस जे काही करतो आहे त्याला अर्थपूर्णता येते. ‘स्ट्रेंग्थ’ जेथे वापरायला मिळतात आणि विकसित होण्याची संधी असते, असे काम करताना समाधान लाभते. अर्थात प्रत्येकाला असे काम करायला मिळेलच आणि त्यातून अर्थप्राप्ती होईलच, हे सांगता येत नाही. म्हणजे अर्थप्राप्तीसाठी जे करतो ती ‘उपजीविका’ आणि ‘सिग्नेचर स्ट्रेंग्थ’ वापरून आपण जे करतो ती ‘जीविका’, असे म्हणता येईल.

yashwel@gmail.com