– सुनीत पोतनीस

मादागास्कर हा स्वायत्त देश म्हणून अस्तित्वात आल्यावर १९६० साली त्यास संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्यत्व मिळाले. स्वातंत्र्यानंतरच्या मधल्या दहा-बारा वर्षांत मादागास्करमध्ये माक्र्सवादी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था गडगडली. दिवाळखोरीत निघालेल्या या देशाच्या सरकारवर पुढे २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही आर्थिक बंधने लादून बरीचशी कर्जे माफ केली. सध्या मादागास्करची अर्थव्यवस्था विविध शेतमाल आणि खनिजांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मादागास्कर व्हॅनिलाचा सर्वात मोठा जागतिक पुरवठादार आहे. त्याशिवाय येथून कॉफी, लवंगा आणि मासे यांची निर्यात होते. खनिजांपैकी कोबाल्ट आणि निकेल यांच्या निर्यातीतूनही या देशाला चांगले उत्पन्न मिळते. मादागास्करमधील सध्याचे सरकार अमेरिका, जपान यांच्या साहाय्याने काही खाणींचे आधुनिकीकरण करून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या मादागास्करमध्ये ८५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मीय, तर आठ टक्के इस्लाम धर्मीय आहेत. फ्रेंच, इंग्रजी या मादागास्करच्या राजभाषा असल्या, तरी तेथील स्थानिक मालागासी भाषा अधिक प्रचलित आहे. अंतानानारिवो हे राजधानीचे शहर येथील सर्वाधिक लोकसंख्येचे औद्योगिक शहर आहे.

मादागास्करचे खरे वैशिष्ट्य तेथील अनन्य जैववैविध्यात आहे. इथे असलेल्या वनस्पती आणि कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी ७५ टक्के प्रजाती दुर्मीळ आहेत, त्या अन्यत्र कुठेही आढळत नाहीत! या जैव प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनाच्या हेतूनेही मोठ्या संख्येने पर्यटक मादागास्करला येत असतात. येथील सुमारे १२ हजार वनस्पती प्रजाती जगात अन्यत्र आढळत नाहीत. त्यामध्ये १६५ प्रकारचे पामवृक्ष आहेत. रविनाला या पामवृक्षाचे चित्र मादागास्करचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे आणि ते त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावरही दिसते. काळी-पांढरी चक्रे असलेल्या लांब शेपटीचे लिमूर (चित्र पाहा) आणि त्याच्या ९६ उपजाती ही मादागास्करची खासियत! टेनरेक हा काटेदार उंदीर, चमकणारे सरडे, २७० जातींचे सरपटणारे प्राणी हे जगात मादागास्करशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. मात्र, अलीकडे मादागास्करचे हे प्राणिवैभव शिकार आणि तस्करीमुळे कमी होत चालले आहे.

sunitpotnis@rediffmail.com