– डॉ. यश वेलणकर

माणसाची मूल्ये, त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी तो मोठा झाल्यानंतर वेगवेगळ्या होत असल्या तरी लहानपणी मात्र विकासासाठी एक गोष्ट सर्वाना आवश्यक असते, ती म्हणजे माणसांचा सहवास! तो असेल तरच बाळ बोलू लागते, दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करते. लहानपणी माणसांचा सहवास मिळाला नाही, मुले जंगलात हरवली, प्राण्यांच्या सहवासात जगली तर ती बोलत नाहीत, चार पायांवर प्राण्यासारखी चालत राहतात अशा सुमारे शंभर घटना संपूर्ण जगात नोंदवलेल्या आहेत. ही मुले माणसांना वेगवेगळ्या वयांत पुन्हा मिळाली, पण त्यांच्यात एक साम्य होते. ती मुले बोलायला, चालायला शिकायच्या वयात माणसांसोबत नव्हती. माणसांना ती मिळाली त्या वेळी अर्थातच नग्न होती, मोगली किंवा टारझनसारखी कंबरेला काही तरी गुंडाळूनही नव्हती, कारण त्यांना लज्जा ही भावनादेखील नव्हती. माणसाच्या सहवासात राहू लागल्यानंतर त्यांना कपडे घालून राहायला शिकवणेदेखील अवघड होते. दोन पायांवर चालणे आणि बोलणे हे शिकवणे त्याहीपेक्षा कठीण होते. त्यातील बरीचशी मुले वीस, पंचवीस शब्दांपेक्षा अधिक शब्द शिकू शकली नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कधीच आले नाही, असेही या मुलांना वाढवलेल्या अनेकांनी नोंदवून ठेवले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भीती ही एकच भावना दिसायची. दोन पायांवर उभे राहण्यापेक्षा चार पायांवर उडय़ा मारत जाणेच ती माणसांसोबत अनेक वर्षे राहिल्यानंतरही पसंत करायची. याचाच अर्थ ठरावीक काळात दोन पायांवर चालणारी, एकमेकांशी बोलणारी माणसे दिसलीच नाहीत तर जन्मत: या क्षमतांचे बीज असूनही ते विकसित होत नाही. चालणे, बोलणे याचप्रमाणे हसणे, भावनांचे विविध रंग अनुभवणे हेदेखील अनुकरण करीतच माणूस शिकतो हे अशा उदाहरणातून दिसते आहे. जगातील साऱ्या संस्कृतींत चेहऱ्यावरील भावना ओळखणे सारखेच असले तरी, हे केवळ माणसांच्याच संस्कृतीमध्ये शक्य होते. माणूस दिसलाच नाही तर चेहऱ्यावर विविध भावना दिसत नाहीत. त्यांचे स्वरयंत्र आणि कान व्यवस्थित असले तरी त्यांना बोलता येत नाही याचे कारण लहान वयात मेंदूमध्ये या क्रियांसाठी आवश्यक असलेल्या जोडण्या तयारच झाल्या नसाव्यात. ‘मिळणाऱ्या अनुभवानुसार मेंदू सतत बदलत असतो’ हा न्यूरोप्लास्टीचा सिद्धांत या मुलांना का लागू झाला नाही याचे कारण मेंदूची जडणघडण होत असतानाच्या काळात त्यांना ते अनुभव मिळाले नाहीत हे असावे असे शास्त्रज्ञांना वाटते.

yashwel@gmail.com