News Flash

कुतूहल : मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया

देशातील किनारी भागातील अडीचशेहून अधिक संशोधक- शिक्षक- अभ्यासक- तज्ज्ञ संस्थेचे सभासद आहेत.

संग्रहित छायाचित्र

 

खारफुटी संशोधन, संवर्धन व संरक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रणी सामाजिक संस्था म्हणजे ‘मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया (एमएसआय)’! ‘खारफुटी वनस्पती’ या शब्दाला जगभरात फार महत्त्व नव्हते तेव्हा, म्हणजे १९८९ साली मुंबईतील एका राष्ट्रीय परिषदेत ‘मँग्रोव्ह मॅन ऑफ इंडिया’ डॉ. अरविंद उंटवाले यांनी सदर संस्थेच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. थोर उद्योजक व पर्यावरणरक्षक पद्मभूषण एस. पी. गोदरेज हे संस्थेचे पहिले अध्यक्ष व डॉ. उंटवाले कार्यकारी सचिव (तहहयात) होते. जवळपास तीस वर्षे अव्याहत कार्यरत असणारी ही संस्था, कालांतराने ‘राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्था (एनआयओ)’ या गोवास्थित शासकीय आस्थापनेत नोंदणीकृत सामाजिक संस्था म्हणून स्थिरावली. एनआयओमध्ये १९७३ पासून सुरू असलेल्या खारफुटी संशोधनाला गती व मान्यता मिळाली ती एमएसआयमुळे!

देशातील किनारी भागातील अडीचशेहून अधिक संशोधक- शिक्षक- अभ्यासक- तज्ज्ञ संस्थेचे सभासद आहेत. केंद्रीय व विविध राज्यांतील वन व पर्यावरण विभाग, देशातील अनेक शासकीय, शैक्षणिक संस्था आणि संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (यूएनडीपी), युनेस्को, जपानमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर मँग्रोव्ह इकोसिस्टीम अशा जागतिक संघटनांच्या साहाय्याने एमएसआय खारफुटी क्षेत्रात जनजागरण, प्रशिक्षणासाठी मोलाचे काम करत आहे.

गोवा, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत प्रामुख्याने खारफुटी जतन व संगोपनासाठी संस्थेने प्रचंड कार्य केले आहे. सातशेहून अधिक हेक्टर क्षेत्रावर खारफुटी लागवड केली आहे. जनजागृतीसाठी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या मदतीने संस्थेकडून मोठय़ा प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जातात. खारफुटी वनस्पतींची रोपवाटिका हा नावीन्यपूर्ण प्रकल्प संस्था गेली काही वर्षे यशस्वीरीत्या चालवीत आहे. पर्यावरण प्रभाव निर्धारण प्रकल्प- शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांसाठी- खारफुटी जतन केंद्रस्थानी ठेवून करणे हे संस्थेच्या यशाचे मुख्य कारण आहे. गोव्यातील चोराव बेटावरील १७८ हेक्टर क्षेत्रफळाचे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, गुजरातमधील साबरमती नदीमुखाच्या तटावरील खारफुटी रोपवाटिका ही काही प्रमुख उदाहरणे. मुंबई व इतर महानगरांतील अनेक विकास प्रकल्पांत खारफुटीसंदर्भातील सल्लागार म्हणूनदेखील संस्थेने खारफुटी जतनात यश मिळविले आहे.

‘मंगलवन’ हे मुखपत्र संस्थेच्या कार्याची ओळख करून देते. यंदा २६ जुलै रोजीच्या ‘जागतिक खारफुटी दिना’निमित्त संस्थेने ‘खारफुटी जंगल व मानवी सुरक्षा’ या संकल्पनेवर आधारित वेबसंवाद व भित्तिपत्रक स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली आहे. एकुणात, देशात खारफुटी वनस्पतींना ओळख व संरक्षण मिळवून देण्यात ‘मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

– डॉ. विनोद धारगळकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 12:07 am

Web Title: article on mangrove society of india abn 97
Next Stories
1 कुतूहल : खारफुटी संशोधनाचे जनक..
2 मनोवेध : देहभान
3 मनोवेध : शरीरात स्मृती
Just Now!
X