News Flash

नवदेशांचा उदयास्त : मॉरिशस : पोर्तुगीज, डच, फ्रेंच 

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी भारताकडे जाणारे काही पोर्तुगीज खलाशी थांब्यासाठी मॉरिशसच्या या निर्जन बेटावर प्रथम आले

(संग्रहित छायाचित्र)

– सुनीत पोतनीस

आफ्रिका खंडाच्या प्रमुख भूमीपासून साधारणत: दोन हजार कि. मी.वर हिंद महासागरात पूर्वेकडे असलेले द्वीपराष्ट्र मॉरिशस हे चार बेटांचे मिळून बनलेले आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या १३ लाख लोकसंख्येपैकी ५१ टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत आणि त्यापैकी बहुतेक सर्व हे हिंदूधर्मीय आहेत. हिंदू बहुसंख्येने असणारे मॉरिशस हे आफ्रिका खंडातले एकमेव राष्ट्र. १२ मार्च १९६८ रोजी ब्रिटिश सत्तेकडून स्वातंत्र्य मिळवून ‘मॉरिशस’ हा स्वायत्त, स्वयंशासित देश अस्तित्वात आला.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी भारताकडे जाणारे काही पोर्तुगीज खलाशी थांब्यासाठी मॉरिशसच्या या निर्जन बेटावर प्रथम आले. मानवी वस्ती नसलेल्या या बेटावर त्यांनी वसतिस्थाने बांधून काही दिवस ते तिथे राहिले. पण पुढे मॉरिशसमध्ये राहण्यात त्यांना स्वारस्य न वाटल्याने १५१८ साली त्यांनी ते सोडले. जाण्यापूर्वी पोर्तुगीजांनी मॉरिशसशेजारच्या दोन छोट्या बेटांना ‘रॉड्रिग्ज आयलँड’ व ‘मास्करेन्ह आयलँड’ अशी नावे दिली. मॉरिशस बेटसमूहावर आलेले पहिले युरोपियन हे पोर्तुगीज खलाशी होत.

पुढे १५९८ मध्ये हॉलंडहून पूर्वेकडे मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी निघालेली तीन जहाजे समुद्रातील चक्रीवादळामुळे भरकटत जाऊन मॉरिशसच्या किनाऱ्याला लागली. तिथे वस्ती करताना डचांनी हॉलंडचा लोकप्रिय राजपुत्र प्रिन्स मॉरिस याचे नाव या अपरिचित बेटाला देऊन ते ‘मॉरिशस’ केले. डचांनी तिथे उसाची लागवड करून हॉलंडमधून पाळीव प्राणी आणले. या बेटांवर त्या काळात एबनी वृक्षांची अमाप पैदास होती. १६३८ साली डचांनी मॉरिशसमध्ये वसाहत स्थापन करून शेजारच्या मादागास्करमधून ऊसमळ्यांमध्ये आणि तंबाखूच्या लागवडीसाठी सहाशे गुलाम मजूर आणून वसवले. परंतु या बेटावर सतत होणारी चक्रीवादळे, प्रतिकूल हवामान तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनीला मॉरिशसच्या वसाहतीतून नियमितपणे होणाऱ्या तोट्यामुळे डचांनी या द्वीपावरची आपली वसाहत १७१० साली रद्द केली आणि ते हे बेट सोडून निघून गेले.

या पूर्वीपासूनच मॉरिशस बेटाजवळचे एक लहान बेट सध्याचे रियुनियन आयलँडवर फ्रेंचांचा ताबा होता. डच गेल्यावर १७१५ साली फ्रेंचांनी मॉरिशसवर कब्जा करून या द्वीपाचं नाव केलं-‘आइल दे फ्रान्स’!

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:08 am

Web Title: article on mauritius portuguese dutch french abn 97
Next Stories
1 कुतूहल : क्षितीजविस्तार
2 नवदेशांचा उदयास्त : नायजेरिया – सध्याचा
3 कुतूहल : डिडो राणीची गोष्ट
Just Now!
X