– डॉ. यश वेलणकर

सजग पालकत्वाची सुरुवात गर्भधारणा झाल्यापासून होत असते. गर्भधारणा झाली की स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. गर्भाशयाचा आकार वाढू लागतो. त्यासाठी शरीरातील अनेक रसायने बदलतात. याचा परिणाम तिच्या भावनांवरही होतो. आनंद आणि उदासीच्या लाटा अधिक मोठय़ा होतात. चिंता, भीती वाढते. या नऊ महिन्यांच्या काळात २० टक्के स्त्रियांना कधी ना कधी औदासीन्य येते असे संशोधनात दिसत आहे. याचा दुष्परिणाम बाळावरदेखील होतो. त्याची योग्य वाढ होत नाही, अकाली प्रसूतीची शक्यता वाढते. साक्षीध्यान औदासीन्य कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचा सराव गर्भिणी अवस्थेत केला की त्याचे कोणते परिणाम होतात यावर संशोधन होत आहे. शरीरातील बदल आणि संवेदना साक्षीभाव ठेवून पाहण्याचा सराव केल्याने चिंता आणि उदासी कमी होते. या काळात काही स्त्रियांना अचानक छातीत धडधडू लागते. अशी धडधड होण्याचे प्रमाण साक्षीध्यानाने कमी होत नसले तरी त्याची भीती वाटत नाही. शरीरात होणाऱ्या अनेक बदलांचा हा परिणाम आहे याचे भान स्त्रीला राहते. पोटातील भार वाढू लागल्याने अनेक त्रासदायक संवेदना जाणवू लागतात. त्यांचा स्वीकार करण्याची क्षमता साक्षीध्यानाचा सराव करणाऱ्या स्त्रियांत, असा सराव न करणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत बरीच वाढते. लक्ष वर्तमान क्षणात ठेवण्याचा सराव करत राहिल्याने प्रसूतीची भीती कमी होते. गर्भिणी अवस्थेत दहा प्रतिशत स्त्रियांचा रक्तदाब वाढतो. साक्षीध्यानाच्या सरावाने हे प्रमाणदेखील कमी होते असे संशोधनात दिसत आहे. गर्भिणी अवस्थेत रक्तातील साखर वाढून राहते आणि त्यामुळे पाच टक्के स्त्रियांना मधुमेह जडतो. साक्षीध्यानाचा सराव केल्यास रक्तातील साखर व मधुमेहाची शक्यतादेखील कमी होते. प्रत्यक्ष ध्यानवर्गात सहभागी न होता फोनमधील ‘ऑडिओ’  ऐकून रोज ध्यानाचा सराव करणे आणि त्याचा असा सराव न करणाऱ्या स्त्रियांशी तुलनात्मक अभ्यास करणे, दोन्ही गटांतील उच्च रक्तदाब, मधुमेह, चिंता आणि उदासी यांच्या प्रमाणात फरक पडतो का याचाही अभ्यास होत आहे. या अवस्थेत ध्यानाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत याची खात्री पटल्याने जगभरातील अनेक संस्था त्यामध्ये काम करीत आहेत. भारतातील स्त्रीरोग प्रसूतितज्ज्ञांनीदेखील अशा संशोधनात सहभागी होण्याची आवश्यकता आहे.

yashwel@gmail.com