03 June 2020

News Flash

मनोवेध : तणावमुक्तीसाठी ध्यान

१९७१ साली ते पीएच.डी. झाले. डॉ. झिन यांना ध्यानाचा परिचय व्हिएतनामी बौद्ध भिक्षू थीच न्हात हान्ह यांच्यामुळे झाला.   

थीच न्हात हान्ह

डॉ. यश वेलणकर

साक्षीध्यानाचा आरोग्यासाठी उपयोग सर्वप्रथम जॉन काबात झिन यांनी केला. डॉ. हर्बर्ट बेन्सन ज्या वेळी ध्यानाचे शरीरावर होणाऱ्या परिणाम यावर संशोधन करीत होते, त्याच वेळी- म्हणजे १९७० साली जॉन काबात झिन ‘मॉलेक्युलर बायोलॉजी’चा अभ्यास करत होते. १९७१ साली ते पीएच.डी. झाले. डॉ. झिन यांना ध्यानाचा परिचय व्हिएतनामी बौद्ध भिक्षू थीच न्हात हान्ह यांच्यामुळे झाला.

१९६७ मध्ये अमेरिकेत थीच न्हात हान्ह आले आणि व्हिएतनाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू लागले. मार्टिन ल्युथर किंग यांना ते भेटले. वंशभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या किंग यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचवले. हान्ह यांना नोबेल मिळाले नाही, पण त्यांनी अमेरिकेत सुरू केलेल्या ध्यान वर्गाना चांगला प्रतिसाद मिळू लागला. ‘स्वीट पोटॅटोज मेडिटेशन सेंटर’ या नावाने त्यांनी ध्यान वर्ग सुरू केले. अशाच वर्गात डॉ. झिन ध्यान शिकले. या ध्यानाचा उपयोग तणाव व्यवस्थापनासाठी होतो याचा त्यांना अनुभव आला, त्यांचा पाठदुखीचा त्रास कमी झाला. त्यामुळे ध्यानाचा उपयोग रुग्णांना करून द्यायचा, असे त्यांनी ठरवले.

साक्षीध्यान व अष्टांग योगातील काही योगासने यांचा समन्वय करून त्यांनी आठ आठवडय़ांच्या वर्गाची रचना केली. ‘एमबीएसआर’ अर्थात ‘माइंडफुलनेस-बेसड् स्ट्रेस रिडक्शन’.. म्हणजे सजगतेच्या आधारे तणाव नियंत्रण या नावाने हे वर्ग सुरू झाले. प्रत्येक आठवडय़ात एक दिवस दोन तास सर्वानी एकत्र जमायचे. त्या ठिकाणी डॉ. झिन त्यांना साक्षीध्यान शिकवायचे. असाच सराव दररोज ४० मिनिटे घरी करावा, असे सांगायचे. आता असे वर्ग अनेक रुग्णालयांत घेतले जातात. ते घेणारे हजारो शिक्षक तयार झाले आहेत. या वर्गात ध्यानाच्या जोडीला रुग्णांशी चर्चा केली जाते. एक प्रकारे हे समूह समुपदेशन असते. त्याचबरोबर सजगतेने काही योगासने करून घेतली जातात. अशा वर्गात विविध आजार असलेले रुग्ण सहभागी होऊ लागले आणि या आजारात ध्यानाचा काय उपयोग होतो, यावर संशोधनही सुरू झाले. मानसोपचार करणारे काही डॉक्टर या वर्गात सहभागी झाले आणि त्यांनी या ध्यानाचा उपयोग मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींसाठीदेखील करायला सुरुवात केली.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 12:08 am

Web Title: article on meditation for stress relief abn 97
Next Stories
1 कुतूहल : आक्रमक प्रजाती
2 कुतूहल : विदेशी प्रजाती
3 धर्मातीत ध्यान
Just Now!
X