– डॉ. यश वेलणकर

काही जणांना ध्यानाला बसले की झोप लागते. असे होत असल्यास, आरोग्यासाठी ध्यानाचा सराव करीत असाल तर त्या वेळी कोणताही अपराधीपणा न बाळगता डुलकी काढावी. कारण झोप आरोग्यासाठी, ध्यानापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. ध्यानाच्या वेळी झोप येते याचा एक अर्थ झोपेची शरीराला जेवढी गरज आहे तेवढी ती मिळत नाही असा आहे. अधिक कामे असल्यामुळे किंवा सतत विचारांच्या गर्तेत असल्यामुळे असे होऊ शकते. ध्यानाला बसल्यानंतर शरीर शिथिल, मन निवांत होते; त्यामुळे डुलकी लागते. दिवसभरात अशी एखादी डुलकी काढली तर माणसाची कार्यक्षमता नि आरोग्य अधिक चांगले होते असे संशोधन सांगते. त्यामुळे अशा पाच मिनिटांच्या डुलकीसाठी तरी थोडा वेळ काढून ध्यानाला बसायला हवे. आजच्या अनेक समस्या पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आहेत. अगदी लहान मुलांमध्ये दिसणारी अती चंचलता असण्याचे एक कारण अपुरी झोप आहे. शाळेतील मुलांना पुरेशी झोप मिळाली नाही तर त्यांची ग्रहणक्षमता आणि स्मरणशक्ती दुबळी होते. पुरेशी झोप नसल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील दुबळी होते. शरीरात अनेक घातक रसायने रोज तयार होतात, ती नष्ट झाली नाही तर शरीरात क्षोभ (इन्फ्लेमेशन) वाढते. मधुमेह, हृद्रोग, स्नायू-वेदना अशा अनेक आजाराचे एक कारण शरीरातील क्षोभ आहे. झोपेत असा क्षोभ कमी करण्याचे महत्त्वाचे काम होते. म्हणूनच अनेक आजारांत, शांत झोप मिळाली की बरे वाटू लागते. आहार, व्यायाम अतिशय काटेकोर आणि आदर्श असूनही पुरेशी झोप न घेतल्याने वयाच्या चाळिशीत हार्ट अ‍ॅटॅक आलेली अनेक उदाहरणे दिसतात. याचे कारण रक्तवाहिन्यांत रक्ताची गुठळी करणारी काही रसायने पुरेशी झोप नसेल तर वाढतात. शैशवावस्थेत मुले दिवसभरात १६ ते १८ तास झोपतात. कारण मेंदूच्या विकासासाठी देखील झोप गरजेची असते. वय वाढत जाते तसा झोपेचा कालावधी कमी होऊ लागतो. वृद्धावस्थेत झोपेचा कालावधी कमी होणे नैसर्गिक आहे. प्रत्येक माणसाचा आरोग्यदायी झोपेचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. प्रौढ व्यक्तीला सरासरी रोज सहा ते आठ तास झोप गरजेची असते. तेवढी झोप घेऊनही ध्यानाला बसल्यानंतर डुलकी येत असेल तर त्याचा अर्थ शरीराला आणखी झोप हवी आहे, ती घ्यायला हवी.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com