काही वैज्ञानिक नियम मूलभूत आणि काटेकोर निर्देश देणारे असतात, तर सामाजिक विज्ञान आणि काही अन्य ज्ञानशाखांत मांडलेले नियम हे साधारण ढोबळ दिशा देणारे असतात. अशाच ढोबळ दिशा देणाऱ्या नियमांत, संगणकाच्या वाढणाऱ्या कार्यक्षमतेबाबत एक नियम प्रसिद्ध आहे. हा नियम ‘मूरचा नियम’ म्हणून ओळखला जातो. हा नियम १९६५ साली गॉर्डन मूर या अमेरिकी इलेक्ट्रॉनिक अभियंत्याने ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या शोधपत्रिकेत चार पानी लेखात मांडला. त्याचे तात्पर्य असे आहे की, ‘संगणकात वापरल्या जाणाऱ्या मायक्रोप्रोसेसरची (चिप) क्षमता दर अठरा महिन्यांनी दुप्पट होत जाईल!’ चिपमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट अधिकाधिक प्रमाणात संकलित करण्याचा कल बघून, मूर याने संबंधित आलेख वापरून आणि आकडेमोड करून हा निष्कर्ष काढला. या वाढीमागचे कारण हे या मायक्रोप्रोसेसरवर बसवलेल्या ट्रान्झिस्टरचा आकार अधिकाधिक लहान होणे हे आहे. १९४० सालच्या दशकात जे ट्रान्झिस्टर मिलिमीटर आकाराचे होते, त्यांचा आकार १९८० सालापर्यंत त्याहून एक हजार पटींहून लहान झाला होता. (२००० सालापर्यंत तर याचा आकार याहूनही शंभर पटींनी लहान झाला.)

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
loksatta analysis car t cell therapy effective treatment on blood cancer
विश्लेषण : ब्लड कॅन्सरवर प्रभावी ठरू शकते स्वदेशी उपचार प्रणाली? ‘कार-टी सेल ट्रीटमेंट’ काय आहे?

१९७५ साली हा वेग काहीसा कमी झाल्यामुळे, ट्रान्झिस्टरची संख्या दुप्पट होण्याचा काळ मूरने अठरा महिन्यांवरून दोन वर्षांवर नेला. मात्र आज वापरात आलेल्या त्रिमितीय ट्रान्झिस्टरमुळे, आजही ट्रान्झिस्टरची संख्या दुप्पट होण्याचा वेग अठरा महिन्यांवरच असल्याचे आढळले आहे. मूरच्या नियमात एक महत्त्वाची गोष्ट गृहीत धरली आहे, ती म्हणजे या साधनाच्या निर्मितीत भविष्यातसुद्धा सिलिकॉन हेच मूलद्रव्य वापरले जाईल. सिलिकॉनच्या काही प्रतिकूल गुणधर्मामुळे ट्रान्झिस्टरच्या आकारावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. छोटय़ा जागेत बसवलेल्या इतक्या मोठय़ा संख्येतील ट्रान्झिस्टरमुळे निर्माण होणारी उष्णता ही या संख्येवर मर्यादा आणू शकते. तसेच सिलिकॉन हे काही इलेक्ट्रॉनसाठी उत्तम वाहक नाही. त्यामुळेही ट्रान्झिस्टरचा आकार फार लहान करणे कदाचित शक्य होणार नाही. जर चिपवर याहून अधिक ट्रान्झिस्टर बसवायचे तर त्यासाठी ग्राफिनसारख्या एखाद्या अधिक कार्यक्षम पदार्थाचा वापर करावा लागेल. अशा परिस्थितीत पुन्हा मूरचा नियम पाळला जाऊ  शकतो. मात्र, मूरने स्वत:च २००५ साली, हा नियम भविष्यात पाळला न जाण्याची शक्यता व्यक्त केली होती.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org