भारतातील बहुतांश शहरांमध्ये झाडांचा गळून पडलेला पालापाचोळा, पाने-फुले, तुटलेल्या फांद्या, नारळाच्या झावळ्या अशा विविध स्वरूपांत ‘जैविक कचरा’ जमा होत असतो. ग्रामीण भागात या प्रकारच्या जैविक कचऱ्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी शेतांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सोयाबीन, कापूस या व इतर विविध पिकांची कापणी केल्यानंतर खाली उरलेले धांडे हादेखील जैविक कचऱ्याचा एक घटक म्हणून गणला जातो.

शहरांमध्ये सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा जागोजागीचा जैविक कचरा सफाई कर्मचाऱ्यांकडून एकत्र करण्यात येतो. उघडय़ावर त्याचे ठिकठिकाणी ढीग लावले जातात आणि मग तो पेटवून दिला जातो. यात अनेकदा प्लास्टिक व तत्सम वस्तूदेखील असू शकतात. खेडय़ांत बहुतांश शेतकरी पिकाची कापणी केल्यानंतर उरलेला भाग शेतातच जाळून टाकतात. परंतु असा कचरा जाळणे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे; कारण यातून निर्माण झालेल्या धुरामध्ये अनेक घातक वायू असतात. यामुळे हवेचे खूप मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते आणि या धुराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना श्वसनाच्या व्याधी जडण्याची दाट शक्यता असते.

याव्यतिरिक्त या कचऱ्यात असलेली अत्यंत बहुमोल अशी जैविक ऊर्जादेखील वाया जाते आणि या जैवविघटनशील असलेल्या कचऱ्यातील पोषक तत्त्वेदेखील नष्ट होतात. त्यामुळे अशा प्रकारचा कचरा उघडय़ावर जाळण्याऐवजी नियंत्रित मार्गाने जाळला तर त्यापासून अतिशय शुद्ध, उत्कृष्ट दर्जाचा आणि उच्च उष्मांक मूल्य (कॅलरीफिक व्हॅल्यू) असलेला व सुपीक जमिनीसाठी आवश्यक ती सर्व पोषक तत्त्वे असलेला कोळसा (बायोचार) मिळवता येतो.

या बायोचारचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन प्रदेशात साधारण १५ व्या शतकापूर्वी (कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वीचा काळ) अस्तित्वात असलेल्या, पण आता नामशेष झालेल्या संस्कृतींचा शोध घेणाऱ्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांना कोलंबसपूर्व काळातल्या स्थानिक रहिवाशांकडून कसलेली जमीन आणि आधुनिक काळातील रहिवाशांकडून कसण्यात येत असलेली जमीन यांच्या सुपीकतेमध्ये खूप मोठी तफावत आढळली. तेव्हाचे लोक लाकूड संपूर्णपणे जाळून त्याची राख करण्याऐवजी नियंत्रित पद्धतीने जाळून त्याचे बायोचारमध्ये रूपांतर करून ते जमिनीत मिसळत असल्याचे पुरावे या शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. यामुळेच पोषक तत्त्वे असलेल्या विविध घटकांबरोबरच बायोचारच्या अधिक प्रमाणामुळे तयार झालेल्या ‘काळ्या जमिनी’ (टेरा प्रेटा) कोलंबसपूर्व काळात खूप मोठय़ा प्रमाणावर होत्या, असे या संशोधनातून समोर आले आहे.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org