20 September 2020

News Flash

कुतूहल : संगीत.. पक्ष्यांचे!

‘पक्ष्यांची भाषा’ असे म्हणताना त्यात शब्दांव्यतिरिक्त व्याकरण असणे अनिवार्य असते

(संग्रहित छायाचित्र)

 

आपण राहत असलेल्या परिसरात रोज किमान चिमण्यांची चिवचिव अथवा कावळ्यांचा कर्कश्श आवाज हमखास आपल्या कानांवर पडत असतोच. थोडे शहराबाहेर गेल्यावर आणखी काही वेगवेगळे आवाज कानांवर पडतात. अजून पुढे दाट जंगलात गेल्यावर तर आपण संगीताच्या मैफिलीत आलो आहोत की काय, असा भास व्हावा इतक्या विविध प्रकारचे आवाज ऐकू येतात आणि या आवाजांचे धनी प्रामुख्याने विविध प्रकारचे पक्षी असतात. पक्षी आपल्या भावना एक तर अतिशय मधुर आणि लयबद्ध ‘गाणे गाऊन’ व्यक्त करतात किंवा एकमेकांना ‘हाळी’ देऊन. ही त्यांची सांकेतिक भाषा असते.

‘पक्ष्यांची भाषा’ असे म्हणताना त्यात शब्दांव्यतिरिक्त व्याकरण असणे अनिवार्य असते. पोपटावरील संशोधनात त्यांच्या कॉल्समध्ये व्याकरणातील नाम, क्रियापद आणि विशेषण असण्याची शक्यता आढळून आली आहे. गाण्यात आवर्ती बांधणी असण्याची शक्यता दर्शविली गेली. नर पक्षी विणीच्या हंगामात गाणे गातात ते स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी. माणसांच्या गाण्याप्रमाणे पक्ष्यांच्या गाण्यालासुद्धा फ्रेज, युनिट्स, सिलेबल्स आणि नोट्स असतात आणि त्याची तुलना आपल्या धृवपद, कडवे, शब्द आणि अक्षरे यांच्याशी होऊ शकते. काही पक्षी सकाळी गातात, तर काही संध्याकाळी. आफ्रिकेत आढळणाऱ्या सुगरण पक्ष्याच्या एका प्रजातीत तर नर आणि मादी चक्क ‘युगलगीत’ गातात असे आढळून आले आहे!

हळद्याचे बोलणे गप्पा मारल्यासारखे असते, तर पाण्याच्या आसपास वावरणाऱ्या खंडय़ाचा आवाज तीव्र, लांबवर ऐकू जाणारा असतो. बदामी बगळ्याचा खूप अंतरापर्यंत पोहोचणारा गंभीर आवाज, बाल्कनीत येणाऱ्या बुलबुलचा विशिष्ट आवाज, इतरांच्या आवाजांची नक्कल करणारा कोतवाल, पोपटांच्या थव्यांची कलकल, कोकीळचा कुऽऽऽहू, होल्याचे टूटूडड्डटू, घारीचा टिपेचा लांबवर ऐकू जाणारा आवाज, घुबडाचा हूउट असा एका लयीत येणारा, त्याची हद्द सांगणारा आवाज, नाचण पक्ष्याचा चक्चक् असा निर्णायक आणि भांडखोर आवाज.. हे सर्व निश्चितच काहीतरी संदेश देत असतात.

पक्ष्यांना त्यांच्या गाण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते. पिल्लांना अंडय़ात असताना कानांवर पडणाऱ्या विविध स्वरांमधून स्वत:चा सूर शोधावा लागतो. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मान्य नसलेल्यांच्या म्हणण्यानुसार पक्ष्यांची गाणी, त्यांचे मधुरस्वर हे केवळ त्यांच्या स्वत:च्या आनंदासाठी असतात. पक्ष्यांच्या गाण्यामुळे, कॉल्समुळे त्यांच्या प्रजातीची ओळख पटते. त्या गाण्यातील विविधतेचा उपयोग नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत निश्चित होत असावा. आता यापुढे जंगल भटकंतीला जाल तेव्हा या संगीताचा जरूर आस्वाद घ्या!

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 12:06 am

Web Title: article on music of birds abn 97
Next Stories
1 मनोवेध : कुटुंब समुपदेशन
2 कुतूहल : फुलपाखरांची शरीररचना
3 मनोवेध : स्वभावाला औषध
Just Now!
X