27 October 2020

News Flash

कुतूहल : राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस

सद्य:स्थितीत वीजनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आदी पारंपरिक इंधनसाठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत

संग्रहित छायाचित्र

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या नवीन व पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाच्या पुढाकाराने २००४ सालापासून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी भारतात ‘अक्षय ऊर्जा दिवस’ साजरा होऊ लागला. २० ऑगस्ट २००४ रोजी झालेल्या पहिल्या ऊर्जा दिनाच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याने एक विशेष तिकीटही प्रसिद्ध केले. यानिमित्ताने पहिल्या वर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे या ऊर्जावान आणि प्रभावशाली मोहिमेला चालना देण्यासाठी सुमारे १२ हजार शालेय विद्यार्थ्यांची एक विशाल मानवी साखळी तयार केली गेली. अक्षय ऊर्जा दिनाचे मुख्य उद्दिष्ट- पारंपरिक ऊर्जास्रोतांसह अपारंपरिक किंवा अक्षय ऊर्जास्रोतांचाही वापर व्हावा यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा राबवणे, हे आहे. कारण अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून ऊर्जा मिळवण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक संसाधनांची हानी व ऱ्हास होत नाही. तसेच हे ऊर्जेचे स्रोत ऊर्जेचा अखंड पुरवठा करण्यास सक्षम असतात.

सद्य:स्थितीत वीजनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आदी पारंपरिक इंधनसाठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. तसेच यामुळे प्रदूषणासारख्या पर्यावरणीय समस्या वाढून जीवसृष्टीला त्रास होत आहे. यासाठीच अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर द्यायला हवा. आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात स्वयंपाक आणि इतर कामांसाठी लाकूडफाटा मोठय़ा प्रमाणात जाळला जातो. यामुळे जंगलतोड तर होतेच; शिवाय धूर, अनारोग्य यांसारखे इतर प्रश्न निर्माण होतात.

अपारंपरिक ऊर्जेच्या वापराने अनेक समस्यांवर उत्तरे मिळतील. यात सौर, पवन, कृषी कचरा, जल, सेंद्रिय कचरा, जैव अवशेष आदींपासून मिळणाऱ्या विजेचा समावेश होतो. अशा ऊर्जास्रोतांचा सुयोग्य वापर म्हणजे एक प्रकारचा मानव-निसर्ग सुसंवादच आहे. कृष्णाने द्रौपदीला अक्षय थाळी दिली होती, तसेच निसर्गाने आपल्याला कधीही न संपणारे ऊर्जास्रोत- म्हणजेच अक्षय ऊर्जा दिली आहे. तिचा जपून उपयोगच मानवाला तारणार आहे. दैनंदिन जीवनातील ऊर्जावापर तपासून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जावापरावर भर देणे, अशा ऊर्जेविषयी माहिती देणारे प्रकल्प बनवणे, सौरतापक, सौरदिवा यांसारख्या उपकरणांच्या वापरावर भर देणे. या सगळ्या प्रयत्नांमुळेच सक्षम भारताची निर्मिती होणार आहे.

– रुपाली शाईवाले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:07 am

Web Title: article on national renewable energy day abn 97
Next Stories
1 मनोवेध : साक्षीध्यान
2 कुतूहल : ऊर्जेचा प्रवाहो चालिला!
3 मनोवेध : एकाग्रता ध्यान
Just Now!
X