इंधन किंवा ऊर्जा स्रोतांच्या दुर्भिक्ष्याचे संकट आता मानव समाजाच्या अगदी दरवाज्याजवळ येऊन उभे राहिले असताना आणि त्या स्रोतांच्या आजवरच्या वापराने वातावरण विनाशाचे प्रमाण भयानक अवस्थेत असताना, ‘निसर्गसंवादी ऊर्जाविवेक’ हेच यावरील उत्तर असणार आहे. मात्र, तो विवेक विकास पद्धती आणि मानव-निसर्ग सहकार्य/ सहचार्य याबाबतची दीर्घकालीन समज यांवरच अवलंबून असणार आहे. प्रश्न दैनंदिन आयुष्यातील ऊर्जा वापराचा आहे, सवयीचा आहे, राहणीमानाचा आहे. त्यामुळे याकामी सामान्य नागरिकांच्या सहकार्याची आणि सहभागाची अतिशय आवश्यकता आहे.

अमेरिकेतील डेलवेर विद्यापीठातील नोबेल परितोषिक विजेते प्रा. डॉ. जॉन बर्न यांनी सुचविलेली ‘शाश्वत ऊर्जा सेवासंस्था’ (एसईयू) ही योजना आपल्याकडेही खूपच प्रभावी ठरू शकते. ऊर्जेची बचत, ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणारी उपकरणे आणि अक्षय ऊर्जा जास्तीत जास्त वापरणे या त्रिसूत्रीवर आधारलेली ही योजना, ऊर्जेचे आणि पर्यावरणाचे दोन्ही प्रश्न प्रभावीपणे हाताळू शकते. समाजातील सर्व घटकांमध्ये ऊर्जेच्या आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल, तसेच अक्षय ऊर्जेच्या वापराबद्दल जागृती निर्माण करून त्यांना ऊर्जेच्या व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याची क्षमता या योजनेत आहे. या योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी ऊर्जातज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक यांची ना नफा ना तोटा तत्त्वावर सेवासंस्था स्थापन करून त्यामार्फत ‘एसईयू’ राबविता येते.

यात त्या-त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अक्षय ऊर्जेपासून माफक खर्चात वीजनिर्मिती करण्यावर भर दिला जातो. ती वीजनिर्मिती स्थानिक ठिकाणी केली जाते; त्यामुळे वीज वितरणावर होणारा भरमसाट खर्च, तसेच त्यामुळे होणारी वीजगळती टळते. या योजनेसाठी लागणारे भांडवल हे वित्तीय संस्था, सरकारी अनुदान, विश्वस्त संस्था यांच्याकडून मिळू शकते. ऊर्जा स्वत:च निर्माण केलेली असल्याने ती गरजेइतकीच वापरण्याच्या वृत्तीला चालना मिळते. बचत झालेल्या पैशातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी भांडवल उभे करता येते. लोकांनी स्वत: ऊर्जा निर्माण करून स्वत:च व्यवस्थापन करण्याची पद्धत, तसेच ‘समाज-ऊर्जा-पर्यावरण’ असे नवे नाते निर्माण करून शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल होऊ शकते.

– डॉ. संजय मंगला गोपाळ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org