– डॉ. यश वेलणकर

माणसाच्या साऱ्या सवयी मेंदूतील ‘न्यूरॉन्स’च्या पक्क्या जोडण्यांचा परिणाम असतो. काही जणांना बोलताना ‘काय समजलात’ असे काही शब्द पुन:पुन्हा म्हणायची सवय असते, काही जण मधेच डोळा मारतात, काही जण नखे खातात. हे घडते त्या वेळी ती व्यक्ती सजग नसते. कोणतेही कौशल्य सवयीचे झाले, की ते सहजतेने घडते. सायकल चालवताना पेडल, ब्रेक योग्य वेळी नकळत मारले जातात. त्याप्रमाणेच सवयीच्या कृतीही घडतात. कोणतीही कृती पुन:पुन्हा केली गेली की सवयीची होते.

आपण दोन पायांवर चालतो तेही सवय झाल्यानेच सहजतेने शक्य होते. लहान मुले चालण्यास शिकत असतात तेव्हा त्यांच्या मेंदूला खूप कष्ट घ्यावे लागतात. मोठेपणीही कोणतेही नवीन कौशल्य शिकताना माणसाच्या ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ला- म्हणजे वैचारिक मेंदूला त्यामध्ये सहभागी व्हावे लागते. तेव्हा मेंदूला ऊर्जाही अधिक लागते. पण त्या कौशल्याची सवय झाली, की शरीराच्या त्या भागाच्या हालचाली करणाऱ्या मेंदूच्या भागात ‘न्यूरॉन्स’च्या जोडण्या पक्क्या होतात. त्यानंतर वैचारिक मेंदूला त्या कृतीमध्ये सहभागी व्हावे लागत नाही. तो त्याचे अधिक महत्त्वाचे विचार करण्याचे काम करीत राहतो आणि कृती सहजतेने होऊ लागते. अशी कृती करीत असताना मेंदूला ऊर्जादेखील अधिक लागत नाही.

कोणत्याही कृतीचा दहा हजार तास सराव केला तर माणूस त्यामध्ये पारंगत होतो, असा एक सिद्धांत आहे. तो या सवय निर्माण करण्याच्या तत्त्वावर आधारित आहे. ध्यानाचा नियमित सराव केला की सजग राहण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, याचे हेच कारण आहे. मात्र, सवयी बदलायच्या असतील तर प्रयत्नपूर्वक सजग राहायला हवे. कारण माणूस सजग नसतो त्याच वेळी सवयीने कृती होतात. कोणतीही नवीन सवय स्वत:ला लावायची असेल, तर सुरुवातीला रोज नेमाने ती कृती करायला हवी. एखादी कृती- उदा. व्यायाम- न चुकता २१ दिवस केल्यास सवय लागते, असे काही संशोधनांत दिसत असले तरी प्रत्येक वेळी ते खरे ठरते असे नाही. हा कालावधी प्रत्येक व्यक्ती व  कृतीसाठी कमी-जास्त असू शकतो. पण कंटाळा न करता सवय लागेपर्यंत रोज ती कृती केली की मेंदूतील जोडण्या पक्क्या होतात. आरंभशूरपणाची सवय बदलून व्यायाम, ध्यान, वाचन, लेखन यांसारख्या सवयी लावायच्या असतील, तर रोज त्या कृती करायला हव्यात.

yashwel@gmail.com