News Flash

नवदेशांचा उदयास्त : नायजेरिया – सध्याचा

नव्या घटनेप्रमाणे १९९९ मध्ये बहुपक्षीय निवडणूक होऊन ओबासांजो हे राष्ट्राध्यक्षपदी निर्वाचित झाले

 राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी

– सुनीत पोतनीस

१९६० मध्ये अस्तित्वात आलेल्या प्रजासत्ताक नायजेरियात १९६६ ते १९९९ या ३३ वर्षांच्या काळात लष्करी राजवट सत्तेवर होती. या ३३ पैकी तीन वर्षे चाललेले गृहयुद्ध आणि चार वर्षे हुकुमशाहीचे हडेलहप्पीचे सरकार वगळता नायजेरियातले प्रशासन लष्कराहाती होते. १९९९ साली नायजेरियाच्या राज्यघटनेत काही बदल केले गेले. नव्या घटनेप्रमाणे १९९९ मध्ये बहुपक्षीय निवडणूक होऊन ओबासांजो हे राष्ट्राध्यक्षपदी निर्वाचित झाले. २०१५ आणि २०१९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ‘काँग्रेस फॉर प्रोग्रेसिव्ह चेंज’ या पक्षाचे मुहम्मद बुहारी हे मोठ्या बहुमताने राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. नायजेरियात सध्या अमेरिकन संयुक्त संस्थानांच्या धर्तीवर संघराज्यीय प्रजासत्ताक म्हणजे फेडरल रिपब्लिक पद्धतीची, कार्यकारी अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे असलेली राज्यपद्धती कार्यरत आहे. बहुपक्षीय निवडणुका खुल्या वातावरणात होतात. नायजेरिया स्वतंत्र झाला त्यावेळी लागोस हे औद्योगिक शहर त्या देशाची राजधानी होते; परंतु पुढे ते बदलून सध्या अबुजा ही राजधानी आहे. अठरा कोटी लोकसंख्या असलेला नायजेरिया आफ्रिका खंडातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. मूळचे २५० वांशिक गट जमातींचे लोक इथे राहत असल्याने त्यांच्या वेगवेगळ्या २५० स्थानिक बोली भाषा असल्या तरी त्यापैकी वर्चस्व असणाऱ्या हौसा, योरूवा व इग्बो या तीन वंशगटांच्या भाषा अधिक प्रचलित आहेत.  इंग्रजी ही येथील राजभाषा. नायजेरिया हा देश इस्लाम आणि ख्रिस्ती या धर्मांचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये विभागला गेला आहे. उत्तरेत मुस्लिम बहुसंख्यांक तर दक्षिणेत ख्रिश्चन. जगभरातील मुस्लीमबहुल देशांमध्ये नायजेरियाचा पाचवा क्रमांक तर ख्रिस्ती धार्मिक लोकसंख्येच्या बाबतीत याचा क्रमांक सहावा लागतो. सध्या नायजेरिया संयुक्त राष्ट्रसंघ, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ आणि ओपेक वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे. खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये जगात बाराव्या क्रमांकावर असलेल्या नायजेरियाची अर्थव्यवस्था तेल उद्योग आणि कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. कोको, रबर, पामतेल, भुईमूग ही निर्यात होणारी येथील शेती उत्पादने. नायजेरियाची अर्थव्यवस्था २०१४ साली दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून आफ्रिकन देशांमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 12:14 am

Web Title: article on nigeria current abn 97
Next Stories
1 कुतूहल : डिडो राणीची गोष्ट
2 नवदेशांचा उदयास्त : नायजेरिया स्वतंत्र झाला; पण…
3 कुतूहल : ‘१७२९’ची गोष्ट…
Just Now!
X