News Flash

कुतूहल : कळंब ते केप टाऊन..

१९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात त्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातल्या कळंबमधून पुण्यात आल्या

(संग्रहित छायाचित्र)

कचरा वाहून नेणारी घंटागाडी जवळून गेली तरी दुर्गंधीमुळे आपण दूर जातो. परंतु कुजलेला-नासलेला कचरा, खराब झालेले अन्न, कधी मृत जनावरेसुद्धा.. यांत हात घालून कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे पर्यावरणीय काम कचरावेचक महिला करत असतात. सुरुवातीला केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आणि नंतर सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून सदैव कार्यरत असणाऱ्या अशा स्वच्छता शिलेदारांपैकी एक आहेत- सुमनताई मोरे!

१९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात त्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातल्या कळंबमधून पुण्यात आल्या. गुलटेकडी भागातला एक पदपथ हाच त्यांचा निवारा. कुटुंबात एकूण सहाजण. सुमनताई शहरातल्या कचराकुंडय़ांवर जाऊन भंगार गोळा करत. नवरा पोतराज. दोघांचे मिळून रोजचे जेमतेम तीस-चाळीस रुपये मिळत. ‘कचरा, भंगार गोळा करणारे म्हणजे चोरच’ असा (गैर)समज सार्वत्रिक होता. त्यामुळे सतत होणारी कुचेष्टा आणि त्याबरोबर पोलिसांचा ससेमिरा मागे असायचा. कचरावेचकांमध्ये एकसंघता नसल्याने त्यांचे शोषण होत असे. अशातच सुमनताईंच्या वस्तीत डॉ. बाबा आढाव यांच्या ‘कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ संस्थेचे कार्यकर्ते या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले आणि सुमनताईंच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले.

संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा व्यवस्थापनाचे आरोग्याशी, पर्यावरणाशी निगडीत महत्त्व सुमनताईंना कळाले. त्यांनी या संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. वस्तीमधील इतर महिलांनाही बरोबर घेऊन त्या कचराकुंडय़ांवर साचणाऱ्या सगळ्याच कचऱ्याचे वर्गीकरण करू लागल्या. कागद, प्लास्टिक, काच वेगवेगळे करून, ते विकून अर्थार्जन होऊ लागले. सुमनताईंनी महिला सहकाऱ्यांना बरोबर घेऊन महापालिका यंत्रणेशी संपर्क साधला. त्यातून शहरातल्या कचराकुंडय़ा हटवून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची योजना राबविली. शहरातल्या सुमारे चार लाख घरांमधून रोज कचरा गोळा होऊ लागला. कचराकुंडय़ा हद्दपार करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सुमनताईंना संस्थेच्या माध्यमातून देश-विदेशातून मार्गदर्शनासाठी बोलावणे येऊ लागले. नेपाळमधील कचरावेचकांना कचरा वर्गीकरणातून पर्यावरणाला होणारे फायदे समजावून कचरा व्यवस्थापनाचे धडे त्यांनी दिले.

दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये २०११ साली झालेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सुमनताईंना मिळाली. २०१५ च्या जूनमध्ये जिनीव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत त्यांनी दुभाषाच्या मदतीने केलेले भाषण खूपच गाजले होते. अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून कचरावेचक महिलांच्या न्याय्यहक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या सुमनताई, आज कचऱ्यातून पर्यावरण संवर्धन आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संधींविषयी जागतिक स्तरावरील मार्गदर्शक ठरल्या आहेत.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:07 am

Web Title: article on one of the cleaners is sumantai more abn 97
Next Stories
1 मनोवेध : षड्विकार
2 कुतूहल : तीन ‘एच’ आणि तीन ‘आर’
3 कुतूहल : पर्यावरणलढय़ातील बालयोद्धय़ा..
Just Now!
X