वय वर्षे चार-पाचच्या आधी मुलांसाठी सर्वात प्रिय गोष्ट असते ती म्हणजे त्यांचे आईबाबा. ते जेव्हा मुलांना काही कारणांनी रागावतात, मारतात, तेव्हा मुलांच्या मनाला धक्का बसतो. आपल्यावर प्रेम करणारे पालक खरे की मारणारे पालक खरे, हे त्यांना कळेनासं होतं. मुलांना प्रेमाचा, सुरक्षिततेचा खरा स्पर्श होतो तो आई-बाबा, आजी-आजोबांमुळेच. प्रेम, सुरक्षितता, भूक भागणं, खेळणं, गप्पा मारणं हे सारं त्यांच्यामुळेच तर असतं.

शिक्षा केल्यानंतर थोडय़ाच वेळात मूल आपापल्या कामाला लागतं, पुन्हा खेळायला लागतं, सगळं विसरून पुन्हा पालकांच्या गळ्यातही पडतं. याचा अर्थ असा नाही की, त्याच्यावर काहीच परिणाम झालेले नाहीत. शिक्षेचे परिणाम होतातच. फक्त ते कधी जाणवतात, कधी जाणवत नाहीत. जी मुलं अशा शिक्षा सतत सहन करतात, त्यांना असुरक्षितता भेडसावते. लहान मुलांच्या मेंदूतही अतिताणामुळे कॉर्टसिॉल हे रसायन निर्माण होतं. या ताणाचे परिणाम होत असतात.

एरवी मूल नीट वाटलं तरी त्याच्या मनावर घातक परिणाम झालेले असल्यामुळे मन एकाग्र होण्यात अडथळे येतात. सगळ्यांशी मिळून मिसळून खेळू शकत नाही. मोकळेपणाने कुणाशी मत्री करू शकत नाही. आत्मविश्वास कमी होतो. मनावर झालेला परिणाम शरीरावरही दिसून येतो. थोडक्यात, आपल्याला असं नक्की म्हणता येतं की, शारीरिक शिक्षेचा परिणाम जसा अंतिमत: मनावर होतो त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक दुखापतीचा परिणाम शरीरावरही होतो. मुलाला भूक लागत नाही, पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे त्याची शारीरिक वाढ नीट पद्धतीने होत नाही. असे सगळेच नकारात्मक परिणाम त्याच्यावर होत असतात.

मूल अभ्यास करत नाही अशी आईबाबांसमोरची अडचण असते. प्रत्यक्षात अडचण अभ्यासात नसून भावनिकतेत असते, असं अनेकदा दिसून आलं आहे. मनातल्या नकारात्मक भावना मुलांना अभ्यास करू देत नाहीत.

वाढत्या वयात जेव्हा मूल स्वत:विषयीच्या काही जाणिवा विकसित करू बघत असतं, तेव्हाच असा धक्का बसणं योग्य नसतं. शिक्षा करताना पालकांनी केवळ तात्पुरत्या परिणामांचा विचार करणं हे अत्यंत धोकादायक ठरतं. आपण कोणत्या कारणांसाठी आणि किती तीव्रतेची शिक्षा करत आहोत याचा संयम हवा. शिक्षा करण्याऐवजी अन्य मार्गानी प्रश्न सुटेल का, हेही सुज्ञ आईबाबांनी बघायला हवं.

contact@shrutipanse.com