आपण घरात कचरा एकत्र करून तात्पुरता साठवण्यासाठी ‘डस्टबिन बॅग’ किंवा ‘गारबेज बॅग’ वापरतो; ती केरपिशवी प्रामुख्याने एकदाच वापरता येईल अशा प्लास्टिकची असते. या पिशव्या पूर्वी मोठय़ा आकाराच्या तयार व्हायच्या आणि त्या वापरण्याची मुभा मुख्यत्वे मॉल्स, मोठी रुग्णालये, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब्ज, जैववैद्यकीय कचरा हाताळणाऱ्या कंपन्या यांना होती. या सर्व ठिकाणच्या कचऱ्याची वाहतूक अशा मोठय़ा पिशव्यांमुळे शक्य होते. परंतु कालांतराने उत्पादकांनी लहान आकाराच्या केरपिशव्या बनवण्यास सुरुवात केली अन् त्या घरगुती स्तरावर कशा उपयोगी आहेत हे ग्राहकांना पटवूनही दिले. साहजिकच या पिशव्या मोठय़ा प्रमाणात खरेदी होऊ लागल्या. आता या पिशव्यांचे उत्पादन भारतात प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या पिशव्या ‘पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही किंवा जैविक विघटनशील आहेत’ असे त्यांच्या वेष्टनावर छापलेले असते. तसा उल्लेख असलेली पडताळणी प्रमाणपत्रेही उपलब्ध असल्याचे उत्पादकांकडून सांगितले जाते.

‘एकल उपयोग प्लास्टिकबंदी अधिनियम, २०१८’ अन्वये जरी जैविक विघटनशील पिशव्यांवर बंदी नसली, तरी एखाद्या शहराच्या रोजच्या जमा होणाऱ्या टनावारी कचऱ्यामधील संख्येने प्रचंड असलेल्या या विघटनशील, घरगुती केरपिशव्या खतात रूपांतरित होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. तोपर्यंत त्यामध्ये ठेवलेल्या कचऱ्यातून हरितगृह वायू बाहेर पडत राहणार आणि हवा प्रदूषणात भर टाकणार. त्याऐवजी डस्टबिनमध्ये कागद वापरल्यास डम्पिंग ग्राऊंडवर पडल्यानंतर ओल्या कचऱ्यामुळे भिजून तो लवकर नष्ट होऊ शकतो. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाचा २००० सालचा आदेश आणि ‘घनकचरा व्यवस्थापन अधिनियम, २०१६’नुसार प्रत्येक घरातील वर्गीकरण केलेला ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपांतच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला सोपवायचा आहे. परंतु हे सर्व असूनही या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास केला जातो आणि यामुळे कचऱ्याचा भार अधिक वाढतो.

मुळातच थोडे कष्ट घेऊन आपल्या घरातला कचरा बाहेर जाणारच नाही याची पुरेपूर काळजी घेतली, तर आपण आपले ‘शून्य कचऱ्याचे आदर्श घर’ निर्माण करू शकतो. तसे झाल्यास, कचरा साठवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि कचऱ्याने भरलेल्या पिशवीचा आपल्या घरातून पर्यावरणात होणारा प्रवेश आपोआपच टळेल. यामुळे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनास मोठा हातभार लागेल.

– स्वाती सं. टिल्लू

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org