14 October 2019

News Flash

कुतूहल : पोलिओ निर्मूलन

पोलिओच्या विषाणूंवर लस निर्माण करण्यात जोनास साल्क या अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाला १९५३ साली यश आले.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. रंजन गर्गे

आज उच्चाटन होण्याच्या मार्गावर असणारा पोलिओ हा एकेकाळी सर्वत्र आढळणारा रोग होता. इ.स. १९०८ मध्ये ऑस्ट्रियन वैद्यकतज्ज्ञ कार्ल लांडस्टाइनर आणि एर्विन पॉप्पर यांनी या रोगाचे मूळ शोधून काढले. पोलिओमुळे मृत्यू पावलेल्या एका नऊ  वर्षांच्या मुलाच्या मणक्यातून या वैद्यकतज्ज्ञांनी थोडासा द्रव काढला. हा द्रव त्यांनी जिवाणूंना (बॅक्टेरिया) अटकाव होऊ  शकेल, अशा गाळणीतून गाळला. हा गाळलेला द्रव त्यांनी माकडांना टोचल्यावर या माकडांना काही काळातच पोलिओची लागण झाली. गाळणीतून पार होणारे हे अतिसूक्ष्म रोगप्रसारक जीव म्हणजे विषाणू असल्याची शक्यता होती. पोलिओचे हे विषाणू प्रत्यक्ष दिसू शकले ते १९५०च्या दशकात – इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर सुरू झाल्यानंतर.

पोलिओच्या विषाणूंवर लस निर्माण करण्यात जोनास साल्क या अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाला १९५३ साली यश आले. मॉरिस ब्रॉडी या अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाने १९३०च्या सुमारास वापरलेली परंतु अयशस्वी ठरलेली पद्धतच साल्कने यशस्वीरीत्या वापरली. यासाठी साल्क याने हे पोलिओचे विषाणू माकडाच्या मूत्राशयाच्या पेशींत वाढवून फॉर्मालिन या रसायनाच्या साह्य़ाने त्यांचा मृत्यू घडवला. हे मृत विषाणू त्याने माकडांना टोचले व त्यानंतर या माकडांवर प्रत्यक्ष पोलिओच्या विषाणूंच्या चाचण्या घेतल्या. माकडांना काही पोलिओ झाला नाही. मृत विषाणूंपासून बनवलेली ही लस त्यानंतर त्याने स्वत:सह आपल्या कुटुंबीयांनाही टोचून पाहिली. या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्यावर त्याने शोधनिबंधाद्वारे आपले संशोधन जाहीर केले.

साल्कच्या संशोधनानंतर, सहा वर्षांतच या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. अल्बर्ट साबिन या पोलिश-अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाच्या मते, ही लस तोंडावाटे देता आली तर ते अतिशय सुलभ ठरणार होते. त्याने आपल्या प्रयोगशाळेत विविध प्राण्यांच्या उतींवर पोलिओचे, विविध प्रकारचे विषाणू वाढवले आणि त्यांच्या चाचण्या घेतल्या. यापैकी जनुकीय बदल घडून आलेले तीन प्रकारचे विषाणू, शरीरात पोलिओच्या विषाणूंशी लढा देणारी प्रतिजने (अँटिजन) निर्माण करत असल्याचे अल्बर्ट साबिन याला दिसून आले. जिवंत विषाणूंपासून बनवलेल्या या लसीची त्याने स्वत:वर, स्वत:च्या कुटुंबीयांवर यशस्वी चाचणी घेतली. टोचून घेण्याच्या लसीपेक्षा काही बाबतीत अधिक परिणामकारक असणारी ही तोंडावाटे घेण्याची लस भारतासह जगात अनेक ठिकाणी आज पोलिओवरील प्रतिबंधक उपाय म्हणून वापरली जाते.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

First Published on May 14, 2019 12:04 am

Web Title: article on polio eradication