News Flash

मनोवेध : ध्यानाचा सराव

साक्षीध्यानात हेच केले जाते. याचा सराव म्हणजे शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते, त्याचा कोणतीही प्रतिक्रिया न करता स्वीकार करणे.

संग्रहित छायाचित्र

वर्तन चिकित्सेतील सिद्धान्तानुसार एखाद्या व्यक्तीचे ‘कंडिशनिंग’ झालेले असेल, तर त्याची प्रतिक्रिया चाकोरीबद्ध असते. हे ‘कंडिशनिंग’ बदलण्याचा किंवा स्वच्छ करण्याचा एक उपाय साक्षीध्यान हा आहे. ध्यान ही अंधश्रद्धा आहे, असा अनेक विज्ञानवाद्यांचा दृढविश्वास असतो.  तर आध्यात्मिक माणसांना ‘ध्यान’ या शब्दाविषयी प्रेम असते; पण ध्यानाची दीक्षा आध्यात्मिक गुरूंकडूनच घ्यावी, असा त्यांचा आग्रह असतो. गुरूकृपेशिवाय ध्यान लागत नाही, गूढ अनुभूती येत नाहीत, असे त्यांना वाटत असते. मात्र सत्त्वावजय चिकित्सेतील ध्यानात कोणतीही गूढता नाही. हे ध्यान लागावे- म्हणजे ‘ट्रान्स’ अवस्था यावी, अशी अपेक्षा नसते. हे ध्यान म्हणजे लक्ष देण्याचे प्रशिक्षण असते. पूर्व-संस्कार म्हणजेच ‘प्री-कंडिशनिंग’नुसार शरीर-मन प्रतिक्रिया करते. त्यामुळे मनात अस्वस्थता, राग, उदासी अशा भावना निर्माण होतात. या भावनांचा त्रास कमी करायचा असेल तर जी प्रतिक्रिया दिली जाते ती थांबवायला हवी, आंतरिक वातावरण बदलायला हवे.

साक्षीध्यानात हेच केले जाते. याचा सराव म्हणजे शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते, त्याचा कोणतीही प्रतिक्रिया न करता स्वीकार करणे. सुरुवातीला असा सराव करताना शरीरात काहीच जाणवत नाही. नियमित सराव केला की मेंदूतील ‘इन्सुला’ हा भाग अधिक सक्रिय होतो आणि शरीरातील संवेदना जाणवू लागतात. नाकाच्या प्रवेशद्वाराशी किंवा वरच्या ओठाच्या वर श्वासाचा स्पर्श जाणवू लागणे, हे त्याचे एक लक्षण आहे. ही जशी सूक्ष्म संवेदना आहे, तशाच छातीवर भार येणे, डोके जड वाटणे याही सूक्ष्म संवेदना आहेत. मन अस्वस्थ असते त्यावेळी शरीरात रसायने पाझरतात, शरीरात बदल घडतात आणि ते अशा संवेदनांच्या रूपात जाणवू लागतात. ‘प्री-कंडिशनिंग’नुसार मनाविरुद्ध घडले की अस्वस्थता येते. त्या वेळी शरीरात रसायने पाझरतात आणि छातीवर भार येतो. माणसाचा भावनिक मेंदू त्या संवेदनांनाही प्रतिक्रिया करीत असतो. साक्षीध्यानाचा नियमित सराव असेल तर मनात राग, चिंता- कोणतीही अस्वस्थता आली, की शरीरात संवेदना जाणवू लागतात. त्या संवेदनांना प्रतिक्रिया न करता जाणत राहिलो, की ‘प्री-कंडिशनिंग’ बदलता येते. त्यासाठी पूर्वग्रह बाजूला ठेवून साक्षीध्यानाचा सराव करायला हवा.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:05 am

Web Title: article on practice of meditation abn 97 2
Next Stories
1 कुतूहल : वर्षां जलसंधारण – १
2 मनोवेध : चतुर्विध योग
3 कुतूहल : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था
Just Now!
X