जीवसृष्टीतील सर्वच सजीवांना त्यांच्या त्यांच्या विविध जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी उपलब्ध असलेली ऊर्जा ही विशिष्ट प्रकारच्या रासायनिक घटकांच्या रूपात असते. सूर्याचे किरण पृथ्वीवर येतात आणि सारा आसमंत उजळून टाकतात, तेव्हा या किरणांमधील विकिरण ऊर्जा (रेडियंट एनर्जी) ग्रहण करून ती जीवावरणातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची प्राथमिक जबाबदारी निसर्गाने विविध प्रकारच्या परिसंस्थांचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या हरित वनस्पतींकडे सोपवली आहे. मग ती रानावनात, जंगलांमध्ये, देवरायांमध्ये दाटीवाटीने वाढणारी झाडे-झुडुपे असोत किंवा खाडय़ा-समुद्र यांच्या लगतच्या दलदलीत वाढणारी खारफुटींची जंगले असोत अथवा नद्या, तलाव, सागर, महासागर यांच्या पाण्यातील अतिसूक्ष्म हरित किंवा वनस्पती प्लावके असोत; या सर्वाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे स्वत:ला आणि संपूर्ण जीवसृष्टीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अन्नरूपी (रासायनिक) ऊर्जेचा पुरवठा करणे.

यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे हवेत असलेला कार्बन डायऑक्साइड हा वायू आणि जमिनीत असलेले विविध पोषक द्रव्यांनी युक्त असे पाणी. या हरित वनस्पती त्यांच्या पानांच्या पृष्ठभागावर असलेल्या असंख्य सूक्ष्म छिद्रांमधून हवेतील कार्बन डायऑक्साइड आत घेतात आणि मग हा वायू पानाच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे वनस्पतींचीमुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि ते पानांमधील प्रत्येक पेशीला पुरवतात. पानाच्या प्रत्येक पेशीमध्ये एक अतिशय प्रभावी यंत्रणा कार्यरत असते. पेशींच्या अंतर्गत असलेले ‘हरित लवके’ (क्लोरोप्लास्ट) नावाचे मुख्य ‘अवयव’ (ऑरगॅनेल्स) या यंत्रणेचा एक प्रमुख भाग आहेत. सूर्याची विकिरण ऊर्जा शोषून घेण्यासाठी या हरित लवकांची अंतर्गत रचना अतिशय वैशिष्टय़पूर्ण असते. यामध्ये अतिशय सूक्ष्म अशा गोल आकाराच्या ‘तबकडय़ा’ असतात आणि त्या एकमेकांना जोडलेल्या असतात. या तबकडय़ांमध्ये ‘क्लोरोफिल’ नावाचे रंगद्रव्य (पिग्मेन्ट— एक प्रकारचे प्रथिन) असते. याचे वेगवेगळे प्रकार असतात. याशिवाय झॅन्थोफिल आणि अ‍ॅन्थोसायनिन या नावाची रंगद्रव्येदेखील असतात.

सूर्याचा प्रकाश पानांच्या पृष्ठभागावर पसरतो तेव्हा क्लोरोफिलचे रेणू विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांमधील ऊर्जा वापरून कार्बन डायऑक्साइड व पाणी यांचा संयोग घडवून आणतात आणि अतिशय गुंतागुंतीच्या रासायनिक अभिक्रियांच्या माध्यमातून अंतिमत: ग्लुकोज ही साखर तयार होते. या रासायनिक अभिक्रिया पार पडत असताना संपूर्ण जीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन या वायूची निर्मिती होऊन तो बाह्य वातावरणात सोडला जातो. अशा रीतीने हरित वनस्पतींद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर ग्लुकोजरूपी रासायनिक ऊर्जेत करण्यात येते.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org