– डॉ. यश वेलणकर

सकारात्मक मानसशास्त्र या शाखेमध्ये आनंद कसा मिळतो याचे अभ्यास होत असतात. आनंद केवळ बाह्य़ परिस्थितीवर अवलंबून नसतो तर मनाच्या प्रतिसादावर ठरत असतो. मनातील विचारांचे आंदोलन शांत होते त्या वेळीच आपल्याला निर्भेळ आंतरिक आनंदाचा अनुभव येतो असे अनेक प्रयोगांतून स्पष्ट होत आहे. मॅथ्यू किलिन्ग्जवर्थ आणि डॅनिएल गिल्बर्ट ऊंल्ल्री’ ॅ्र’ुी१३ यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून असाच एक शोध घेतला. स्मार्टफोनचे एक ‘अ‍ॅप’ त्यांनी तयार केले. या अ‍ॅपद्वारे, ८० देशांतील १८ ते ८८ वयोगटातील पाच हजार माणसांनी या संशोधनात सहभाग घेतला.

http://www.trackyourhappiness.org या संकेतस्थळावर या सर्व माहितीची नोंद केली गेली आणि नंतर त्याचे विश्लेषण करण्यात आले. या ‘अ‍ॅप’वरून वेगवेगळ्या वेळी तीन प्रश्न विचारले जायचे. यापैकी पहिला प्रश्न होता : आत्ता तुम्हाला कसे वाटते आहे (हाऊ आर यू फीलिंग राइट नाऊ?) या प्रश्नाचे उत्तर ० म्हणजे अतिशय वाईट ते १०० म्हणजे अतिशय छान यामधील एक अंक निवडून द्यायचे; दुसरा  प्रश्न असायचा आत्ता तुम्ही काय करीत आहात? येथे नेहमीच्या कामांचे बावीस पर्याय होते, त्यापेक्षा वेगळे काम असेल तर त्याचीही नोंद करता येत असे. तिसरा प्रश्न – तुमचे मन तुम्ही जे काही करीत आहात त्यामध्येच आहे की दुसऱ्या विचारात भटकते आहे का? याच्या उत्तरादाखल चार पर्याय होते- (१) नाही, (२) हो – सुखद विचारांत, (३) हो – दु:खद विचारांत, (४) हो – असुखद/ अदु:खद विचारांत! तिन्ही प्रश्नांच्या, एकंदर साडेतीन लाख उत्तरांचे विश्लेषण करण्यात आले, त्यावरून तीन निष्कर्ष  निघाले : (१) माणसाचे मन नेहमीची कामे करीत असताना बराच वेळ भटकत असते, (२) मन विचारात असेल तर आनंद वाटत नाही. मन सुखद विचारात असले तरी तो क्षण आनंददायी नसतो. माणूस विचारात भरकटलेला नसतो, क्षणस्थ असतो त्या वेळीच अधिक आनंदी असतो. (३) करत असलेल्या कामापेक्षा मनातील विचार हेच आनंदाचे किंवा दु:खाचे महत्त्वाचे कारण असते. तन्मयता असेल तर दैनंदिन कामेही आनंद देणारी असतात. चंचल मन आनंदी नसते हे कालातीत सत्य या संशोधनाने अधोरेखित केले. मनाची ही चंचलता कमी करून आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर निरुपयोगी विचारांना महत्त्व न देता आपले लक्ष पुन:पुन्हा वर्तमान क्षणात आणण्याचा सराव करायला हवा.

yashwel@gmail.com