आधुनिक मानसशास्त्रात साठच्या दशकापासून व्यक्तीचा विचार केवळ वर्तनावरून न करता त्याच्या भावना आणि विचार म्हणजेच अंतर्विश्व समजून घेऊन केला जातो. समुपदेशनात हे समजून घेण्यासाठी प्रश्न विचारले जातात. भारतीय तत्त्वज्ञानात या तीन घटकांसोबत ध्यान म्हणजे ‘अटेन्शन’ या चौथ्या घटकाचाही विचार केलेला आहे. माणसाचे उन्नयन करणारे ‘योग’ हे शास्त्र आहे. वरील चार घटकांनुसार योगाचेही चार प्रकार आहेत. त्यातील वर्तनाला म्हणजे कृतीला महत्त्व देणारा ‘कर्मयोग’ आहे. मानसशास्त्राच्या भाषेत कृती हा आपल्या नियंत्रणात असलेला घटक आहे; मात्र त्याचे फल हा नियंत्रणात नसलेला घटक आहे. जे काही नियंत्रण करण्यासारखे असेल ते करायचे आणि नियंत्रण नसलेल्या गोष्टींचा स्वीकार करायचा, हे मानसोपचारातील तत्त्व ‘कर्मयोगा’त सांगितले आहे. माणसाच्या भावना बदलण्याचा मार्ग म्हणजे ‘भक्तियोग’ होय. ईश्वरभक्ती ही भावनाच आहे. ती मनात धारण करून, जे काही घडते आहे ती भगवंताची कृपा आहे, असा भाव ठेवला तर चिंता, उदासी यांचा त्रास संभवत नाही. अंतर्विश्वातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विचार! त्याला महत्त्व ‘ज्ञानयोगा’त दिले जाते. मनात येणारे विचार हा सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचा खेळ आहे. त्यांना महत्त्व न देता ‘अहं ब्रह्मास्मि’ हे भान म्हणजेच साक्षीभाव कसा ठेवायचा, याचीच चर्चा उपनिषदे आणि अष्टावक्र गीता यांमध्ये केलेली आहे. रज, तमगुण प्रबल असतील तेव्हा मन अस्वस्थ असते. ती अस्वस्थता कमी करण्यासाठी सत्त्वगुणाचे बळ वाढवणे आवश्यक असते. ते कसे वाढवायचे, हे आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सेत सांगितले आहे. हे ज्ञान हाही ज्ञानयोगाचाच भाग आहे.  मात्र हे तीनही योग शक्य होण्यासाठी आपले लक्ष कुठे आहे, याचे भान वाढवून ते ठरवलेल्या ठिकाणी नेण्याचा सराव- म्हणजेच ध्यान आवश्यक असते. ते ज्या योगात सांगितले आहे, त्याला ‘राजयोग’ म्हणजे योगांचा प्रमुख म्हणतात. बुद्ध, पतंजली यांनी तो सांगितला आहे. विल्यम जेम्ससारख्या मानसशास्त्रज्ञांनी- ‘स्वत:च्या इच्छेने आपले ध्यान ठरावीक ठिकाणी नेता येणे हीच माणसाची सर्वात मोठी क्षमता आहे,’ असे फार पूर्वी सांगितलेले असले, तरी त्याचा विचार २१ व्या शतकापर्यंत फारसा होत नव्हता. मात्र आता ध्यान म्हणजे ‘अटेन्शन ट्रेनिंग’ हा मानसोपचारातील महत्त्वाचा भाग बनला आहे.

yashwel@gmail.com