घरात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे घरगुती पातळीवर अथवा सामूहिकरीत्या ‘कम्पोस्ट’ म्हणजेच जैविक खत करण्याचे प्रमाण  वाढणे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. या प्रक्रियेत तयार झालेले खत हे नंतर कुंडय़ांमध्ये किंवा बागेत लावलेल्या झाडांसाठी वापरता येते. या ‘कम्पोस्ट’मुळे मूळ मातीची गुणवत्ता, मातीची रचना (माती एकत्र ठेवणे, मातीतील सच्छिद्रता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता) सुधारते आणि मातीमध्ये वनस्पतीला फायदेशीर असे जीवाणू मिसळले जातात.

या घरगुती ‘कम्पोस्ट’चा दर्जा किंवा गुणवत्ता ‘कम्पोस्ट’च्या भौतिक—रासायनिक गुणधर्मांवर अवलंबून असतो. यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन (एन), फॉस्फरस (पी), पोटॅशियम (के), सेंद्रिय कार्बन आणि ओलावा व तापमान या घटकांचे प्रमाण महत्त्वाचे ठरते. यातील नायट्रोजन ‘नायट्रेट नायट्रोजन’ आणि ‘अमोनियम नायट्रोजन’ या स्वरूपात असतो. अपरिपक्व ‘कम्पोस्ट’मध्ये अमोनियम नायट्रोजन जास्त असतो आणि शोषून घेण्यासाठी तो झाडाला तात्काळ उपलब्ध होऊन वनस्पतीच्या वाढीस उपयुक्त होतो. तर परिपक्व ‘कम्पोस्ट’मध्ये सेंद्रिय नायट्रोजन मोठय़ा प्रमाणात सेंद्रिय रेणूंमध्ये बंदिस्त असतो. त्याची उपलब्धता जीवाणूंच्या विघटन क्षमतेवर अवलंबून असते. ‘कम्पोस्ट’मधील फॉस्फरस हा कुजण्याच्या क्रियेबरोबर हळूहळू वाढत जातो. केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेनुसार, ‘एन—पी—के’या पोषकतत्त्वांचे प्रमाण प्रत्येकी एक टक्क्यापेक्षा जास्त असायला हवे आणि घरगुती ‘कम्पोस्ट’मध्ये नायट्रोजनचे एकूण प्रमाण मूल्य ०.५ ते तीन टक्के इतके असायला हवे. ‘कम्पोस्ट’मध्ये सेंद्रिय भाग ९०—९५ टक्के इतका असला तरी, मुख्यत्वे ‘एन—पी—के’ आणि सूक्ष्म पोषक घटक तुलनेने कमी असतात. अर्थात, त्यामध्ये ऋतू आणि काही प्रमाणात कचऱ्यातील घटकांनुसार बदल होतो.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

‘कम्पोस्ट’मधील आणखी एक जीवनावश्यक घटक म्हणजे ‘कार्बन : नायट्रोजन’चे प्रमाण, ज्यावर त्याची थेट वापरासाठीची योग्यता अवलंबून असते. हे प्रमाण सरासरी ३०:१ असे असायला हवे. याचबरोबर निर्मितीप्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक तितका ओलावा, योग्य तापमान हे घटकदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ओलाव्याचे सरासरी प्रमाण हे ५०—६० टक्के इतके असायला हवे, तर तापमान साधारण २७ ते ४० अंश सेल्सिअस इतके असायला हवे. आपल्या ‘कम्पोस्ट’चे नमुने आपल्या गावात किंवा शहरात असलेल्या माती—परीक्षण प्रयोगशाळेत दिल्यास त्याची गुणवत्ता कळू शकेल आणि आपली ‘कम्पोस्ट परिसंस्था’ किती सुदृढ आहे हेदेखील कळेल.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org