जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे हे युवा वर्गास संबोधित करताना सांगतात : ‘‘कोणतेही कार्य हाती घेताना नेहमी तीन ‘एच’चा वापर करा, तुम्हाला त्यात नक्की यश मिळेल!’’ ते तीन ‘एच’ म्हणजे- हेड, हार्ट आणि हॅण्ड्स! पर्यावरण क्षेत्रात कार्य करताना एखादी नावीन्यपूर्ण कल्पना सुचते, तिला हृदयापासून स्वीकारून दोन्ही हातांच्या साहाय्याने पूर्ण केले की समस्येची उकल सहजपणे होऊ शकते. डॉ. चितळे यांची हीच कल्पना आता कचऱ्यारूपी भस्मासुरास नेस्तनाबूत करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने वापरण्यात येते. ‘वेगळ्या’ कारण यात ‘तीन एच’ची जागा ‘तीन आर’नी घेतली आहे. ते तीन ‘आर’ म्हणजे- रिडय़ुस, रियुज आणि रिसायकल.. थोडक्यात, टाकाऊपासून टिकाऊ!

कचरा, मग तो जैविक असो वा अजैविक- (१) शक्यतो कमी करणे (रिडय़ुस), (२) चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू असतील तर त्यांना एकदम टाकून न देता वापरात ठेवणे (रियुज) आणि (३) खराब झाल्यास पुनर्वापरासाठी पाठवणे (रिसायकल), असे या त्रिसूत्रीत अभिप्रेत आहे. निर्माण झालेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने हाताळला तर त्यामधून अर्थाजन, उद्योगधंदे आणि नोकऱ्यांची संधी निर्माण होऊ शकतात.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

‘कचरा’ म्हणून टाकाऊ ठरवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बागेत बसण्यासाठी बाके, खुर्च्या, मॅट्स, पिशव्या, बास्केट.. अशा किती तरी उपयोगी वस्तू तयार करता येऊ शकतात. इतकेच नव्हे, तर अशा बाटल्यांचा खुबीने वापर करून त्यांत शोभिवंत फुलझाडे लावून घराच्या भिंतींवर ‘व्हर्टिकल गार्डन’ची सुंदर सजावटदेखील करता येते. घरातील ओल्या कचऱ्यापासून उत्तम प्रतीचे खत तयार होते. हेच खत कुंडय़ांमधील भाजीपाल्यास घालून आपण घरच्या घरी सेंद्रिय उत्पादन घेऊ शकतो. कार्यालयात अथवा इतर ठिकाणी टाकून दिलेले कागद कार्डबोर्डमध्ये रूपांतरित करता येतात. या कार्डबोर्डचा वापर पॅकिंगमध्ये केला जातो. वापरलेल्या एक्स-रे फिल्मपासून ‘आनंदवन’मध्ये सुंदर भेटकार्डे तयार केली जातात.

एकुणात, ‘टाकाऊ वस्तू’ या उत्तम संसाधन ठरू शकतात हे ध्यानात घेऊन वरीलप्रमाणे अथवा अन्य कल्पक प्रयत्नांद्वारे पर्यावरणपूरक ‘टिकाऊ’ उत्पादन तयार करता येऊ शकते. आता शासनयंत्रणेबरोबरच वैयक्तिक स्तरावरदेखील या दृष्टीने कृतिशील पावले पडण्याची गरज आहे. डॉ. चितळे यांनी सांगितलेल्या ‘तीन एच’चा वापर करून ‘तीन आर’ची अंमलबजावणी केली तर पर्यावरण संवर्धनास नक्कीच हातभार लागेल!

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org