– सुनीत पोतनीस

गेल्या वर्षभरातल्या भारतीय आणि परदेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या व इतर प्रसारणांचा साधारण आढावा घेतला तर असे दिसते की, त्यातला सर्वाधिक भाग कोविड-१९ ने व्यापलेला होता. क्रिकेटमधील धावसंख्येविषयी जितकी उत्सुकता असते, तितक्याच कुतूहल व काळजीने भारतातील अनेक गावांमधील, राज्यांमधील करोनाबाधित आणि करोनाबळी यांची दैनंदिन संख्या जाणून घेतली जात होती. अनेक देशांतला करोनाचा ‘स्कोअर’ ठळकपणे माध्यमांमधून प्रसिद्ध केला जात होता.

गत वर्षी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक, या निवडणुकीच्या निकालावरून झालेला वादंग, या बातम्यांच्या भाऊगर्दीतच जगाच्या कानाकोपऱ्यांतील विविध देशांचे आपसांतले संघर्षही आपल्याला कळत होते. अनेक देशांत चाललेल्या यादवींबद्दलही बातम्या येत होत्या. दहशतवाद्यांच्या कारवायांचेही प्रमाण गेल्या आठ-दहा महिन्यांत कमी झाल्याचे दिसून आले. हा करोनाचा परिणाम असू शकेल!

सामान्य भारतीयाला ज्ञात नसलेले, आकारमानाने छोटे, अगदी आपल्याला चिल्लर वाटावे असे अनेक देश जगाच्या कानाकोपऱ्यांत वसलेले आहेत. त्यांतील काही देशांची नावे आपल्या कानावरून गेलेली असतात. परंतु या देशांमध्ये राजकीय, सांस्कृतिक घडामोडी काय चालल्यात याचे सोयरसुतकही आपल्याला नसते.

या यादवी संघर्षांच्या बातम्यांमध्ये ठळकपणे लक्ष वेधून घेण्यात- अझरबैजान व आर्मेनिया या देशांमध्ये नागोर्नो काराबाख या भूप्रदेशाच्या मालकीहक्कावरून चाललेला संघर्ष; इथिओपिआतला उत्तरेकडील टिग्रे या प्रांतातील लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य, सार्वभौमत्व मिळावे म्हणून वेळोवेळी केलेले उठाव; चिनी प्रजासत्ताकापासून आपल्याला फारकत मिळावी म्हणून हाँगकाँगने चालवलेले आंदोलन; तसेच बलुची लोकांची पाकिस्तानातून वेगळे निघून स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीसाठी चाललेली धडपड.. या घटनांचा समावेश होता.

हे चाललेले उठाव यशस्वी झाले तर त्याचे फलित म्हणून या प्रदेशांमध्ये स्वायत्त, सार्वभौम नवराष्ट्रांची निर्मिती झाली तर नवल वाटायला नको! अलीकडे, एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला अशा दोन नवदेशांची निर्मिती झालीही होती. त्यापैकी ‘दक्षिण सुदान’ हा देश २०११ मध्ये, तर त्यापूर्वी ‘टिमोर लेस्ट’ या देशाची निर्मिती झाली.

sunitpotnis94@gmail.com