– डॉ. यश वेलणकर

आयुर्वेदातील सत्त्वावजय मानसोपचारात मुख्यत: साक्षीध्यान आणि समुपदेशन यांचा उपयोग केला जातो. भारतीय मानसशास्त्रानुसार सत्त्व, रज आणि तम यांनी शरीर-मन बनलेले असते. त्यातील रज किंवा तम अधिक प्रमाणात वाढले, की विशिष्ट त्रास होतात. मन अस्वस्थ असताना सक्रियता, चिंता, भीती असते; त्या वेळी मेंदूतील भावनिक मेंदू अधिक संवेदनशील असतो. या स्थितीत रजोगुण वाढलेला असतो. उदासीयुक्त अस्वस्थता असते, काहीही करू नये असे वाटत असते; त्या वेळी मेंदूतील काही भाग बधिर झालेला असतो. हे तमोगुण वाढला असल्याचे लक्षण म्हणता येते.

रजोगुण वाढला असेल तर शरीरात संवेदना जाणवतात, पण त्यांचा स्वीकार होत नाही. त्या संवेदना खूपच भीतीदायक असतात. असे असेल तर त्या वेळी दीर्घ श्वसन उपयुक्त असते. चार सेकंद श्वास घ्यायचा आणि सावकाश सहा ते आठ सेकंद तो सोडत राहायचे. तो तोंडाने सोडला तर सावकाश सोडणे सोपे जाते. एका मिनिटात असे साधारणपणे सहा श्वास होतात. तीन-चार मिनिटे असे दीर्घ श्वसन केले की शरीरातील संवेदनांची तीव्रता कमी होते; या संवेदना नकोत अशी प्रतिक्रिया न करता त्यांच्याकडे लक्ष ठेवणे शक्य होते. साक्षीभाव ठेवून अर्धाएक मिनिटदेखील ती व्यक्ती शरीरात काय जाणवते आहे ते पाहू शकली, की संवेदनांची भीती व त्यामुळे पुन्हा भीतीदायक संवेदना हे दुष्टचक्र थांबते. सत्त्वगुण वाढतो व त्रास कमी होऊ लागतो.

तमोगुण वाढला असेल तर उदासी असते. शरीरावर लक्ष नेले तरी शरीरात कोणत्याच संवेदना जाणवत नाहीत. अशा वेळी उभे राहून कमरेत एका बाजूला झुकले, की व्यक्ती ठरावीक पातळीपर्यंत झुकू शकते. त्या वेळी शरीरात वेदना, स्नायूंवर ताण जाणवू लागतो. या वेदना कुठे आहेत आणि कुठे नाहीत हे पाहायचे. शारीरिक हालचाली आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना जाणणे यामुळे मेंदूची बधिरता कमी होऊ लागते. दिवसभरात प्रत्येक दोन-तीन तासांनी अशा हालचाली केल्या, की अस्वस्थता असताना शरीरात संवेदना जाणवू लागतात. त्यांना प्रतिक्रिया न करता साक्षीभाव ठेवून पाहायला लागल्याने औदासीन्याचा त्रास कमी होतो. एकाच व्यक्तीमध्ये रजोगुण आणि तमोगुण वेगवेगळ्या वेळी वाढलेला असू शकतो. साक्षीभाव का आणि कसा विकसित करायचा, याचे प्रशिक्षण समुपदेशन प्रक्रियेत केले जाते.

yashwel@gmail.com